थेऊर – करोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे लॉकडाऊनची परिस्थिती आहे. त्या अनुषंगाने कोणत्याही रेशनिंग दुकानदारांनी अन्नथान्याचा अपहार, अथवा नागरिकांची आर्थिक लुबाडणूक करू नये, कसलाही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, अन्यथा संबंधित दुकानदारांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याचा सज्जड इशारा हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांनी दिला आहे.
गोरगरीब लाभार्थ्यांना वेळेत रेशनिंग मिळणेसाठी सर्व गावकामगार तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना रेशनिंग दुकानांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तलाठी काही रेशनिंग दुकानांवर ठाण मांडून बसले आहे. अन्नसुरक्षा किंवा अंत्योदय शिधापत्रिका धारकांना योजनेचे महिनानिहाय धान्य व पीएमजीकेवाय चा विनामुल्य तांदूळ महिनानिहाय (एप्रिल 2020, मे 2020 व जून 2020) वाटप मंजूर झालेले आहे. तसेच एपीएल केशरी कार्डधारक यांच्यासाठी मे 2020 व जून 2020 या दोन महिन्यांचे महिना निहाय वाटप मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली.
तहसीलदार कोळी म्हणाले की, जर रेशनिंगकार्ड धारकाची तकार आली अथवा धान्य अपहारा संबधी तकार आलेस संबंधित दुकानास दंड अथवा दुकान निलंबित न करता जीवनावश्यक वस्तू कायदा अधिनियम 1955 अंतर्गत कलम 3 व 7 नुसार गुन्हा दाखल करणेत येईत. सदरचा गुन्हा हा अजामिनपात्र असून 7 वर्ष करावासाची शिक्षेची यामध्ये तरतूद आहे. तलाठी व मंडलाधिकारी यांनी नागरिकांकडून प्राप्त तक्रारीच्या आधारे अहवाल सादर करावयाचा आहे.