जोहान्सबर्ग – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर महान क्रिकेटपटू आहे हे कोणीच नाकारणार नाही. मात्र, विजयासाठी धावांचा पाठलाग करताना विराट कोहली ज्या पद्धतीने फलंदाजी करतो ते पाहता सचिनपेक्षाही तो जास्त सरस वाटतो, अशा शब्दात दक्षिण आफ्रिकेचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू एबी डिविलीअर्स याने आपले मत मांडले आहे.
दक्षिण आफ्रिका संघाचे तसेच आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर बेंगळूर संघाकडून खेळताना कोहलीच्या स्वभावातील तसेच त्याच्या क्रिकेटबाबतच्या दृष्टिकोनाचा अनुभव घेता आला. त्याच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. अगदी पहिल्यांदा त्याला पाहिले तेव्हा मला तो एक सामान्य खेळाडूच वाटला मात्र, जस जसा मी त्याला ओळखत गेलो तेव्हा त्याच्यातील अफाट गुणवत्ता मला उमगली. सचिन तेंडुलकर जरी जागतिक क्रिकेटचा सर्वात महान खेळाडू असला तरीही जेव्हा संघाला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो तेव्हा कोहली सचिनपेक्षाही जास्त सरस वाटतो, असे डिविलीअर्सने सांगितले.
सचिन हा केवळ कोहलीचा किंवा भारतीय खेळाडूंचाच आदर्श आहे असे नाही मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वीपासून मलाही सचिनची फलंदाजी पाहून आपण पण असाच खेळ केला पाहिजे असे नेहमी जाणवायचे. जगातील कोणत्याही खेळपट्टीवर, कोणत्याही गोलंदाजासमोर आणि संघाची स्थिती कशीही असो जोपर्यंत सचिन खेळपट्टीवर आहे तोपर्यंत सर्वकाही शक्य आहे असेच वाटायचे. अन्य बाबतीत नाही पण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना कोहली ज्या पद्धतीने खेळतो त्यावरूनच मला निदान याबाबतीत तरी तो सचिनपेक्षा सरस वाटतो, असेही त्याने सांगितले.
कोहली म्हणजे फेडरर, स्मिथ म्हणजे नदाल
विराट कोहली व स्टिव्ह स्मिथ यांच्यात तुलना करायची झाली तर कोहली म्हणजे रॉजर फेडरर आहे तर, स्मिथ म्हणजे राफेल नदाल आहे असेच सांगेन. दोघांकडेही अफाट गुणवत्ता आहे. त्यामुळे कधी याचे पारडे जड असते तर, कधी त्याचे पारडे जड असते. यांच्यातील जास्त सरस कोण ते ठरवणे खूप कठीण आहे, असेही डिविलीअर्सने सांगितले.