नवी दिल्ली: भाजपचा दिल्लीतील खासदार असणारा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने सोमवारी आम आदमी पक्षावर (आप) जोरदार पलटवार केला. माझ्या जिलेबी खाण्याने देशाच्या राजधानीतील प्रदूषण वाढत असेल; तर मी जिलेबी खाणे कायमचे बंद करतो, असे त्याने म्हटले आहे.
देशाच्या राजधानीतील प्रदुषणाच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी अलिकडेच एका संसदीय समितीची बैठक झाली. त्या बैठकीला गंभीर उपस्थित नव्हता. भारत-बांगलादेश क्रिकेट सामन्यासाठी इंदूरला असल्याने तो त्या बैठकीला जाऊ शकला नाही. त्यावरून आपने गंभीरला लक्ष्य केले. तसेच, खासदार गंभीर बेपत्ता असल्याच्या आशयाची पोस्टर्सही त्या पक्षाने लावली.
बेपत्ता गंभीर याआधी अखेरीस इंदूरमध्ये जिलेबी खाताना दिसल्याचा उल्लेखही त्या पोस्टर्समध्ये करण्यात आला. त्यावरून गंभीरने आपला प्रत्युत्तर दिले. मला दोन लहान मुली आहेत. त्यामुळे प्रदुषणाचे गांभीर्य मला समजते. दिल्लीतील आप सरकारने माझ्यावर टीका करण्याऐवजी प्रदुषणाला आळा घालण्यावर लक्ष केंद्रीत करावे, असे त्याने म्हटले. आधीच करार झालेला असल्याने मला क्रिकेट सामन्याच्या समालोचनासाठी इंदूरला हजर रहावे लागले, असे स्पष्टीकरणही गंभीरने दिले.