महादेव जाधव
कोंढवा – कोंढवा बुद्रुक स्मशानभूमीलगत ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर पाच नागरिक जखमी झाले. स्कूल बसमधील विद्यार्थी सुदैवाने सुखरुप बचावले. या अपघातात ट्रकने 10-12 वाहनांना धडक दिल्याने मोठे नुकसान झाले. आज झालेल्या अपघातानंतर रस्त्यावर कित्येक किलोमीटर वाहनांची रांग लागली होती. या रस्त्यावर एका तसात साधारण सात ते आठ हजार वाहने धावतात. यामध्ये अवजड वाहनांचे प्रमाण मोठे असल्याने मोठ्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे.
आज झालेल्या या अपघातामुळे 2018 ते 2023 या पाच वर्षांत या रस्त्यावरील मोठ्या, भिषण अपघातांची संख्या आता 56 झाली आहे.
कात्रज ते गोकुळनगर चौकापर्यंत भारती विद्यापीठ हद्द आणि गोकुळनगर चौक ते खडीमशीन चौकांपर्यंत कोंढवा पोलीस ठाण्याची हद्द आहे. दोन्ही पोलीस ठाण्यातील नोंदीवरून अपघातांमध्ये चार वर्षांत 25 जणांच्या मृत्यूंची तर 40 जण (आजच्या अपघाताच्या नोंदीसह) गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे. रस्त्याच्या दुरस्थेमुळेच अपघात घडल्याची कारणे अनेकदा समोर आली आहेत. गेल्याच महिन्यात पॅरामाऊंट-इरोस सोसायटीसमोर दुचाकी घसरल्याने कंटेनरच्या मागील चाकाखाली येऊन युवकाचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर अद्यापही तेथील रस्याची साधी डागडुजीही झालेली नाही.
“कात्रज-कोंढवा रस्त्यावर आज झालेल्या अपघातानंतर पोलीस यंत्रणा तातडीने अपघातस्थळी पोहचली. अपघातग्रस्त वाहने तातडीने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. कोंढवा वाहतूक पोलीस या रस्त्यावर सातत्याने वाहतूक नियोजनाचे काम करीत आहे. “- संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, कोंढवा पोलीस चौकी
कात्रज-कोंढवा रस्ता आजपर्यंत…
- 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कामाचे उद्घाटन
- 2019 भूसंपादनाअभावी रस्त्याचे काम रखडले
- 2021 राज्य सरकारकडून भूसंपादनासाठी 200 कोटींचा निधी
- इस्कॉन मंदिर चौक भुयारी मार्गाच्या कामाला वेग
- 2022 महापालिकेकडून 84 ऐवजी 50 मीटरचा रस्ता
- 2022 मार्च 2024 अखेरीस पूर्ण करण्याचे आश्वासन
- 50 मीटर रस्ता रुंदीकरणानुसार जागा ताब्यात; एक जागा वगळता
- 2023 (ऑगस्ट) आयुक्तांकडून पाहणी 2024 पर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना