विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा
मुंबई : माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकताचा भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यातच आता विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना आपल्या पक्षात घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे. यासाठी खुद्द विजय वडेट्टीवार यांनीच तसा दावा केला आहे. सेनेकडून मला त्यांच्या पक्षात येण्यासाठी आतापर्यंत 25 फोन येवून गेल्याचा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.
चंद्रपूरमध्ये एका कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी हा दावा केला आहे. मला आतापर्यंत सेनेकडून पक्षांतरासाठी वारंवार फोन येत आहेत. वर्षा आणि बांद्यावरून पक्षांतरासाठी फोन येत असून त्यात बांद्यावरून येणाऱ्या फोनची संख्या जास्त असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. एक विरोधी पक्ष नेता भाजपने त्यांच्या पक्षात नेला तर दुसरा सेना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही यावेळी वडेट्टीवार यांनी केला आहे.