धोकादायक इमारतींतील भाडेकरूंचे न्यायालयाने उपटले कान
मुंबई (प्रतिनिधी) – धोकादायक इमारत रिकामी करण्यास कुचराई करणाऱ्या सांताक्रूझमधील रहिवाशांची मुंबई उच्च न्यायालयाने आज चांगलीच कान उघडणी केली. तुम्ही तुमच्या केवळ घराचे मालक आहात. संपूर्ण इमारतीचे नाहीत, हे ध्यान्यात ठेवा. इमारतीचा मालक असल्यासारखे वागू नका. धोकादायक इमारत तत्काळ रिकामी करा, असा आदेशच उच्च न्यायालयाने दिला आहे.
गेल्या महिन्यात डोंगरीत घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महापालीकेने सांताक्रूझ वाकोला येथील 55 वर्षे झालेल्या एका जीर्ण इमारत रिकामी करण्यासाठी महापालिकेने नोटीस बजावली. पाण्याचा आणि विजेचा पुरवठाही खंडीत केला. त्या विरोधात हॅप्पी हाऊस वेल्फेअर सोसायटीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
यावेळी पालिकेच्या वतीने बाजू मांडताना यापूर्वी या इमारतीला पालिकेने नोटीस बजावली होती. त्याला न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र, ती उठविण्यात आली. त्यानंतर पुन्हा बजावलेल्या नोटीसीला स्थगिती मिळावी म्हणून याचिका दाखल करण्यात आली. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.
तसेच या इमारतीच्या बाजूलाच एक शाळा आहे. इमारत कोसळून दुर्घटना घडल्यास शाळेतील विद्यार्थ्यांनाही धोका पोहोचू शकतो. त्यामुळे ही इमारत तत्काळ रिकामी करणे आवश्यक असल्याचा दावा केला. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत इमारत रिकामी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या रहिवाशांना फैलावर घेत इमारत ताबडतोब रिकामी करा, असे आदेश दिला.