Snowfall : हिमाचल प्रदेशमधील हवामानात मोठे बदल झाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह बर्फवृष्टी झाली. हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे चार राष्ट्रीय महामार्गांसह 356 रस्ते बंद असून 162 ट्रान्सफॉर्मर खराब झाले आहेत. यामुळे येथील बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे झालेल्या जोरदार हिमवृष्टीनंतर पर्यटक आणि स्थानिकांसह सुमारे 70 जणांना वाचवण्यात यश आले आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरमधील दोन भागात 80 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे.
हिमाचल प्रदेशातील बर्फवृष्टीमुळे लाहौल-स्पीतीमधील 269, चंबामधील 58 आणि कुल्लू जिल्ह्यातील 21 रस्ते बंद आहेत. रस्ते बंद झाल्यामुळे नागरिकांना चंबा आणि कुलूला जाण्यात अडचणी येत आहेत. याशिवाय जम्मू-काश्मीरमधील पुंछ ते पहलगामपर्यंत बर्फवृष्टी होत आहे. जम्मू-काश्मीरच्या गुलमर्गमध्ये बर्फाचे वादळ आणि हिमस्खलन झाल्याने पर्यटकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
अचानक आलेल्या हिमवादळामुळे एका परदेशी पर्यटकाचा मृत्यू झाला तर दुसरा पर्यटक जखमी झाला आहे. याशिवाय जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील भूस्खलनात एका बांधकाम कंपनीच्या कामगाराचाही मृत्यू झाला. सिक्कीमच्या उत्तर आणि पूर्व भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे.
हिमवृष्टीचा अंदाज हवामान
24 ते 29 फेब्रुवारी या कालावधीत उंचावरील भागात काही ठिकाणी पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याशिवाय 26 आणि 27 फेब्रुवारीलाही काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.