सर्बियाचा अग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविचने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा जिंकताना चारही ग्रॅंडस्लॅम स्पर्धा प्रत्येकी दोनवेळा जिंकण्याचाही विक्रम साकार केला. यंदा जपानमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर जोकोविचला गोल्डन ग्रॅंडस्लॅम साकार करण्याची ही संधी आहे.
वयाची पस्तीशी जवळ आलेली असतानाही जोकोविचने क्ले कोर्टवर आपणही वर्चस्व गाजवू शकतो हेच सिद्ध केले. अर्थात त्यासाठी त्याला ग्रीसच्या नवोदित स्टेफानोस त्सित्सिपासविरुद्ध तब्बल सव्वाचार तास पाच सेटपर्यंत कडवी लढत द्यावी लागली. जोकोविचने अंतिम सामन्यात त्सित्सिपासवर 6-7, 2-6, 6-3, 6-2, 6-4 असा विजय मिळवला व रॉय इमरसन आणि रॉड लेव्हर यांच्या कामगिरीची बरोबरी केली.
गेल्या वर्षी याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अत्यंत सुमार खेळ केल्यामुळे त्याचे ही स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते, ते यंदा त्याने पूर्ण केले. या विजेतेपदासह जोकोविचने कारकिर्दीतील 19 वे ग्रॅंडस्लॅम विजेतेपद साकार केले. चारही ग्रॅंडस्लॅम विजेतेपद दोन वेळा जिंकणारा तो जागतिक टेनिसमधील केवळ तिसराच खेळाडू ठरला. याआधी रॉय इमरसन आणि रॉड लेव्हर यांनी 1969 साली ही कामगिरी केली होती.जोकोविचने 9 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन, 5 वेळा विम्बल्डन, 3 वेळा अमेरिकन ओपन व 2 वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे.
जोकोविचचा हा 29 वा ग्रॅंडस्लॅम अंतिम सामना होता. त्यापूर्वी, स्वित्झर्लंडचा अव्वल टेनिसपटू रॉजर फेडररने 31 ग्रॅंडस्लॅम स्पर्धांचे अंतिम सामने खेळले आहेत. याआधी 2016 साली त्याने अंतिम सामन्यात स्पेनचा लाल मातीच्या कोर्टचा सम्राट राफेल नदालला पराभूत करत पहिल्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. यंदाही त्याने नदालचा अडसर उपांत्य फेरीत दूर करत अंतिम फेरी गाठली होती.
जोकोविचला यंदा जपानमध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्डन ग्रॅंडस्लॅम साकार करण्याची संधी आहे. अमेरिकन, ऑस्ट्रेलियन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन या चारही ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकल्यावर त्यानंतरच्या ऑलिम्पिक स्पर्धेत जर विजेतेपद मिळवले तर त्याला गोल्डन ग्रॅंडस्लॅम असे म्हटले जाते. इतिहासात अशी कामगिरी करणारे अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच टेनिसपटू आहेत. याच यादीत जोकोविचलाही आपले नाव कोरण्याची संधी आहे. खरेतर गुणवत्ता ठासून भरलेली असलेला हा खेळाडू अनेकदा आपल्या खेळापेक्षा अन्य गोष्टींबाबत जास्त चर्चेत राहिला आहे.
यंदाच्या वर्षी बॉलपिकर महिलेला चेंडू मारल्यामुळे त्याला अमेरिकन ओपनमधून बाहेर काढण्यात आले होते. त्याने माफीही मागितली होती. मात्र, परदेशात आपल्यासारखे चूक कोणाकडून घडली आहे ते पाहून लाड केले जात नाहीत, तर चूक काय घडली आहे त्यावरून कारवाई केली जाते. खेळापेक्षा खेळाडू मोठा हा नियम आपल्याकडे राबवला जातो.
परदेशात कोणत्याही खेळाडूकडून गुन्हा घडला तर त्याला सर्वसामान्य गुन्हेगारांसारखेच वागवले जाते. अमेरिकन ओपनमध्ये जे घडले त्याची कुठेतरी सल जोकोविचलाही होती म्हणूनच त्याने फ्रेंच स्पर्धा जिंकल्यावर प्रेक्षकांमधीलच एका मुलाला आपली टेनिस रॅकेट भेट दिली व आपण वर्तन सुधारत आहोत हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. जागतिक टेनिसमध्ये रॉजर फेडरर किंवा राफेल नदाल यांची असलेली मक्तेदारी जोकोविचने मोडून काढली.
जोकोविचकडे अन्य तगड्या खेळाडूंसारखी शरीरसंपदा नाही. मात्र, तरीही तो ताशी 150 किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने सर्व्हिस करतो. त्याचे बॅकहॅंड व फोरहॅंड रिटर्नही समोरच्या खेळाडूला संभ्रमात टाकतात. फारसा उंच नसला तरीही संपूर्ण कोर्ट तो लिलया कव्हर करतो. त्याच्या खेळाचा दर्जा जागतिक टेनिसमध्ये आज तरी अन्य कोणत्या खेळाडूकडे पाहायला मिळत नाही.
अमित डोंगरे