छोटे मासे गळाला, मोठे अद्याप तळालाच!

उमेश सुतार
कराड भूमिअभिलेख कार्यालयात नेमकं चाललंय तरी काय?

कराड  – कराड दक्षिण व कराड उत्तर अशा दोन मतदार संघात विभागलेल्या कराड तालुक्‍याची व्याप्ती मोठी आहे. या दोन्ही विभागातील शेकडो गावांचा कार्यभार कराड तालुका भूमिअभिलेख कार्यालयावर चालतो. या कार्यालयात मोठमोठे जमिनीचे व्यवहार चालत असल्यामुळे भूमिअभिलेखमध्ये अर्थपूर्ण तडजोडी किती चालत असतील, हे या कार्यालयात लाच लुचपत विभागाने दोनदा टाकलेल्या धाडीवरून चव्हाट्यावर आले आहे.

या कारवाईमध्ये मात्र सर्वसामान्य कर्मचारीच भरडला जात असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे या कार्यालयातील अनागोंदी कारभारामुळे मात्र लहान मासे गळाला, मोठे राहिले तळाला, अशीच काहीशी गत होऊन बसली आहे.

कराड भूमी अभिलेख कार्यालयात सद्यस्थितीत एक अधिकारी व 30 ते 35 कर्मचारी कार्यरत आहेत. यातील प्रत्यक्ष हजर किती असतात, हा संशोधनाचा भाग आहे. या सर्वानी मिळून कराड तालुका भूमिअभिलेखचे कामाचा निपटारा करणे शक्‍य आहे. परंतु सामान्य नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा उठवत व पुढाऱ्यापुढे लाळ घोटणाऱ्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देत हे कर्मचारी चिरीमिरीसाठी लाचार बनल्याचे चित्र दिसून येत आहे.

मागील काही वर्षांपूर्वी कराड तालुक्‍याचा भूमिलेख कार्यालयाचा कारभार भांदिर्गे व साळुंखे या अधिकाऱ्यांकडे होता. यावेळी या कार्यालयातून योग्य नियोजन होत असल्याने कामाचा निपटारा जलद होत होता. यामुळे नागरिकांच्या शंका-कुशंका याचे जागेवरच निरसन केले जायचे. या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात 10 ते 15 दिवसात मोजणी अथवा इतर कामे हातावेगळी केली जायची.

मात्र हे अधिकारी बदलून गेल्यानंतर नवा राजा, नवा कायदा या सूत्राप्रमाणे येथील कामकाजात बदल होत गेले. मोजणीचे पैसे भरल्यानंतर दहा दिवसांत होणाऱ्या कामाला तब्बल पाच ते सहा महिने लागू लागल्याने शेतकरी या कार्यालयात हेलपाटे मारून अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकणार नाही.

जमिनीची मोजणी, ही कायम करण्यासाठीच्या कामासाठी भूमिअभिलेख कार्यालयात नेहमीच नागरिकांची ये-जा सुरू असते. याठिकाणी येणारा प्रत्येक नागरिक हा तालुक्‍याच्या विविध ठिकाणाहून पदरमोड करून पाच ते पन्नास किलोमीटरचा प्रवास करून येत असतात. नेमक्‍या याच बाबीचा फायदा या कार्यालयातील कर्मचारी चिरीमिरी उकळण्यासाठी उचलत असतात. कारण डबल हेलपाटे मारण्यापेक्षा चिरीमिरी देऊन काम करून घेण्याकडे नागरिकांचा कल असतो, याचा परिणाम सरळमार्गी होणारे कामसुद्धा टेबलावर वजन ठेवल्याशिवाय पूर्ण होत नाही. यामुळे लोकांमधूनच तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचार्याची संख्या जास्त दिसत असली तरी यातील काही कर्मचारी सिटीसर्वेच्या कार्यालयास द्यावे लागत असल्याने याठिकाणी कामाचा ताण आहे. तालुक्‍यात सिटीसर्वेची कार्यालये तांबवे, वाठार, कोपर्डे, शेणोली, कारवे, उंब्रज, मसूर याठिकाणी असून येथील कर्मचाऱ्याना दोन दोन ठिकाणचा कार्यभार पेलावा लागत आहे. या कार्यालयातून बॅंकेचा बोजा कमी करणे, वारस नोंदी करणे, पोट हिस्से करणे, वेगवेगळ्या मालमत्तेचे एकत्रीकरण करणे, जागेची मोजणी करणे अशी कामे केली जातात. तर भूमिअभिलेखमध्ये जो भाग सिटीसर्व्हेमध्ये समाविष्ट झालेला नाही, अशी सर्व कामे केली जातात.

यामध्ये बिगरशेती करणे, मोजणी करणे, फाळणी नकाशा यासह इतर बाबींचा समावेश होतो. सदरची कागदपत्रे मिळवताना शासकीय फीनुसार 20 ते 50 रुपये भरून मिळणारी ही कागदपत्रे टेबलाखालून 200 ते 300 रुपये दिली की लगेच मिळतात, अशा लोकांच्या वाढत्या तक्रारी ऐकावयास मिळतात. या प्रकारांमुळे ही कार्यालये म्हणजे पैसे खाण्याची कुरणेच बनली आहेत.

मोठ्या माशांना पकडण्याचे आव्हान
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के हे आपल्या पथकासह जिल्हाभर अशा प्रवृत्तीवर बारकाईने नजर ठेवून आहेत. यासाठी संबंधित तक्रारदारांनी पुढे येऊन लाचखोराचे पितळ उघडे पाडण्याची आवश्‍यकता आहे. या पथकाने कराडात दीड महिन्याच्या कालावधीत पोलीस विभागातील दोन तर भूमिअभिलेख विभागातील तीन लाचखोरांवर कारवाई केलेली असली तरीही या पथकासमोर मात्र तरी अद्यापही मोठे मासे पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)