कोलंबो – बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका क्रिकेट मंडळाने 18 खेळाडूंचा संघ घोषित केला आहे. संघाच्या कर्णधारपदी दिमुथ करुणारत्ने यालाच कायम राखण्यात आले आहे. श्रीलंका संघात या मालिकेसाठी नवोदित खेळाडूंना संधी देतानाच काही वरिष्ठ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना 15 मे पासून चितगावमध्ये, तर दुसरा सामना 23 मे पासून ढाक्यात खेळवला जाणार आहे. आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील स्थानाच्या दृष्टीने हा दौरा श्रीलंकेसाठी खूप महत्त्वाचा आहे. श्रीलंका संघ सध्या पाचव्या क्रमांकावर आहे.
संघात कामिल मिशहारा, दिलशान मदुशंका आणि सुमिंदा लक्षण या नवोदितांना स्थान देण्यात आले आहे. तर, लाहिरू थिरिमने, चरिथा असालंका, लाहिरू कुमारा, दुष्मंत चमीरा आणि जेफ्री वेंडरसे या वरिष्ठ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
श्रीलंका संघ – दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), कामिल मिशहारा, ओशादा फर्नांडो, अँजेलो मॅथ्यूज, कुशल मेंडिस, धनंजय डी सिल्वा, कामिंदू मेंडिस, निरोशन डिकवेला, दिनेश चंडीमल, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, सुमिंदा लक्षण, कसुन रजिथा, विश्वा फर्नांडो, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका, प्रवीण जयविक्रमा, लसिथ एम्बुल्डेनिया.