पुणे : शहरात करोनाची साथ वेगाने वाढत आहे. अशा स्थितीत गंभीर झालेल्या रूग्णांना उपचारासाठी शहरात व्हेंटीलेटर्स मिळत नसल्याने प्राण गमवावे लागत आहेत. ही बाब लक्षात घेऊन हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी स्वखर्चातून तब्बल 46 लाखांचे सहा व्हेंटीलेटर्स हडपसर परिसरातील रूग्णालयांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
या व्हेंटीलेटर्सचे लोकार्पन उद्या ( बुधवारी) राज्याचे उपमुख्यंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने केले जाणार आहे. कोवीड 19 च्या महामारीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, नागरिकांना आर्थिक तसेच वैद्यकीय समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ‘बऱ्याच ठिकाणी वैद्यकीय सुविधा आणि रुग्णालयामध्ये बेड्स, व्हेंटिलेटर कमी पडत आहे. अनेक नागरिकांना रुग्णालयात बेड साठी थांबावे लागत आहे.
या आजारात श्वसनाचा त्रास होत असल्याने व्हेंटिलेटर्सची तीव्रतेने गरज जाणवत आहे, हीच गरज ओळखून हडपसरचे आमदार चेतन तुपे पाटील यांनी सामजिक बांधिलकी जपत स्वखर्चाने तब्बल 46 लाखांचे सहा व्हेंटीलेटर हडपसर मतदारसंघातील रूग्णांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
अशा पध्दतीने स्वखर्चाने एवढे व्हेंटीलेटर देणारे आमदार तुपे हे राज्यातील एकमेव आमदार असल्याच्या भावाना हडपसर विधानसभा मतदारांघातील डॉक़्टरांनी व्यक्त केल्या असून या उपक्रमाचे कौतुक तसेच त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
शहरात गंभीर करोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी व्हेंटीलेटर्सची कमतरता आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर तातडीनं सहा व्हेंटीलेटर्स खरेदी केले आहेत. हडपसर मतदारसंघातील वेगवेगळया रूग्नालयांच्या माध्यमातून गरजूंना ते उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे आमदार तुपे यांनी सांगितले.