मुंबई – स्मार्टफोन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची चिनी कंपनी वनप्लस आज भारतीय बाजारपेठेमध्ये आपला एक नवा फोन सादर करणार आहे. कंपनीने या फोनचे नामकरण वन प्लस नॉर्ड असे केले असून लाँचपूर्वीच फोनची बहुतांश फीचर्स उघड केली आहेत. आज हा फोन AR (अग्युमेंटेड रियालिटी) द्वारे ऑनलाईन सादर केला जाणार असून वनप्लसद्वारे या फोनची किंमत उघड केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वनप्लसतर्फे हा फोन मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात येणार असून या फोनची किंमत ३० हजारांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत वनप्लसद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार हा फोन ५ जी असणार आहे.
याखेरीज वनप्लसने या फोनची किंमत कमी असली तरी दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. वनप्लसचे प्रमुख कार्ल पेई यांनी एका मुलाखतीमध्ये याबाबत सांगताना आम्ही, ‘दर्जा कायम ठेवत अनावश्यक औपचारितांसाठी मोजावी लागणारी किंमत टाळली आहे.’ असं म्हंटल होत.
दरम्यान, या फोनमध्ये क्वाडकोअर कॅमेरा सेटअप, ड्युअल फ्रंट कॅमेरा, रॅपिड चार्ज, अमोल्ड डिस्प्ले, ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट असे महत्वपूर्ण फीचर्स देण्यात आले आहेत.
भारतीय वनप्लस नॉर्डला पसंती दर्शवणार? गेल्या काही दिवसांपासून भारत व चीन दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणामुळे भारतामध्ये चिनी वस्तूंविरोधात मोहीम छेडण्यात आली होती. यानंतर भारत सरकारने देखील ५९ चिनी ऍप्सवर बंदी आणली होती. अशातच आता मूळची चीनची कंपनी असलेल्या वनप्लसला भारतीय नागरिक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
असा पहा लाँच इव्हेंट वनप्लस नॉर्डचा लाँच इव्हेंट लाईव्ह पाहण्यासाठी तुम्हाला गुगळे प्ले स्टोअर मधून वनप्लस नॉर्ड AR हे ऍप डाऊनलोड करावे लागणार आहे.