मराठवाड्यातील ‘या’ सहा मंत्र्यांना मिळाले मंत्रीमंडळात स्थान

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मराठवाड्याला सहा मंत्रिपद मिळाली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन जणांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. यात कॉंग्रेसने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. तर राष्ट्रवादीने अपेक्षेप्रमाणे धनंजय मुंडे आणि राजेश टोपे यांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे. विशेषत: धनंजय मुंडे प्रथमच मंत्रिमंडळात दिसणार आहेत.

मराठवाड्यातील सहा जणांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे. यात कॉंग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि अमित देशमुख यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादीनं भाजपाच्या नेत्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव करून विधानसभेत पोहोचलेल्या धनंजय मुंडे यांना अपेक्षेप्रमाणे कॅबिनेटमध्ये जागा दिली आहे.

दुसरीकडे माजी उच्च तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांना संधी दिली आहे. तर शिवसेनेकडून पैठणचे आमदार संदीपान भुमरे आणि कॉंग्रेस सोडून शिवबंधन बांधलेल्या अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिलं आहे. संदीपान भुमरे हे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार असून, अब्दुल सत्तार राज्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.