पुणे – आजच्या वाढत्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना शिक्षणासह सर्वोत्तम संस्काराचे धडे मिळणे आवश्यक आहेत. यातूनच चांगला माणूस घडविण्यास निश्चित मदत होणार आहे. या दृष्टीने शिक्षणासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर “प्रगती इंग्लिश मिडीयम स्कूल”ने भर दिलेला आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करुन देण्याचा ध्यास बाळगत वर्ष 2002 मध्ये स्व. कृष्णराव माने विद्या प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. त्यांनतर धानोरी येथील मुंजाबावस्ती येथे 2002 मध्ये या प्रगती इंग्लिश मिडीयम स्कूल सुरु करण्यात आली होती.
संस्थेचे अध्यक्ष पोपटराव माने, उपाध्यक्ष दादासाहेब बोबडे, सचिव किशोर माने, मुख्याध्यापिका प्रिती माने विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी धडपड करत आहेत. अगदी सुरुवातीला दहा बाय दहाच्या एकाच खोलीत राहून उरलेल्या तीन खोल्यांमध्ये बालवाडीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. त्यावेळी 30 विद्यार्थी संख्या होती. आता इयत्ता दहावीपर्यंत वर्ग सुरु असून सुमारे 1 हजार 950 पर्यंत विद्यार्थी संख्या पोहचली आहे.