बारामती (प्रतिनिधी) – बारामती शहरातील नामांकित व्यापाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणातील सावकारांच्या बारामती शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सहा सावकारांना अटक करण्यात आली असून तिघे जण फरार आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी प्रीतम शहा यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी या व्यापाऱ्याने सुसाईड नोट ठेवली होती. त्यामध्ये या सावकारांच्या नावाचा उल्लेख आहे.
प्रतीक शहा (वय 30) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शहरातील नगरसेवक बबलू ऊर्फ जयसिंग देशमुख, कुणाल चंद्रकांत काळे, संजय कोंडीबा काटे, हनुमंत सर्जेराव गवळी, सनी ऊर्फ सुनील आवाळे, प्रवीण गालिंदे यांना बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे.
विकास धनके, मंगेश ओमासे व संघर्ष गव्हाळे हे फरारी आहेत. सावकारांनी आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचा सहयोग सोसायटीमधील बंगला व्याजापोटी लिहून घेतला होता. सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सावकारांच्या विरोधात अजून कोणाच्या तक्रारी असतील तर बारामती शहर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.