संगमनेर – मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे 2 ऑक्टोबर रोजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये मराठा आरक्षणासाठी ठराव घेतले जणार आहेत.
मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज व इतर मराठा संघटनांची संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक पार पडली. त्यात हा ठराव घेण्यात आला. मराठा आरक्षण प्रश्नी मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक नुकतीच नाशिक येथे संपन्न झाली. त्यानुसार आरक्षणासाठी पुढील रूपरेषा व आंदोलनबाबत चर्चा होऊन तालुकास्तरावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा ठराव करण्यात आला होता. त्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी 2 ऑक्टोंबर रोजी मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शिवाजीनगर येथील घरासमोर सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मराठा आरक्षणासाठी येत्या 2 ऑक्टोबर रोजी संगमनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांत सर्व मराठा बांधवांनी, मराठा संघटनांनी, मराठा सर्व पक्षीय राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन मराठा आरक्षणाबाबत ठराव घेऊन तो मराठा समन्वयकांकडे सुपूर्द करण्याचा ठराव करण्यात आला. तरी समाज बांधवानी 2 ऑक्टोबरला सकाळी ग्रामसभेमध्ये मराठा आरक्षण ठराव झाल्यानंतर संगमनेर येथे ना. थोरात यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.