लखनौ – गॅंगस्टर आणि माजी खासदार अतिक अहमदच्या हत्येतील हल्लेखोरांना प्रयागराज कारागृहातून अन्य दुसऱ्या तुरुंगात हलवण्यात आले आहे. आतापर्यंत हे तीन आरोपी प्रयागराजच्या नैनी तुरुंगात बंद होते. मात्र आता त्यांना प्रतापगड कारागृहात हलवण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अतिकच्या हत्येमुळे या तिघांवर प्रयागराज कारागृहात हल्ला होऊ शकतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. आरोपींची सुरक्षितता लक्षात घेऊन सर्व आरोपींना दुसऱ्या कारागृहात हलवण्यात आले आहे.
अतिकची हत्या करणाऱ्या सनी सिंह, अरुण मौर्य आणि लवलेश तिवारी यांना न्यायालयाने रविवारीच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी प्रयागराज पोलिस आयुक्तांनी अतिरिक्त सीपी गुन्हे सतीश चंद्र यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. या एसआयटीमध्ये एकूण तीन सदस्य आहेत. यात सहायक पोलीस आयुक्त सत्येंद्र प्रसाद तिवारी आणि गुन्हे शाखेच्या तपास कक्षाचे निरिक्षक ओम प्रकाश यांचा समावेश आहे.
दरम्यान, गेल्या शनिवारी रात्री माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या करण्यात आली होती. अतिक आणि त्याच्या भावाला पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता ही हत्या करण्यात आली होती. या घटनेत तीन आरोपींचा समावेश होता. अतिकपर्यंत पोहोचण्यासाठी आरोपींनी स्वतःला पत्रकार असल्याचे दाखवले होते. या हत्येनंतर या तीन आरोपींना अटक करण्यात आली होती.