नवी दिल्ली – गेल्या 12 एप्रिल रोजी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटीक रिफॉर्म्स या संस्थेचा एक अहवाल आहे. त्यात निवडणुकीच्या काळात देशातील 30 राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यानुसार 30 पैकी 29 मुख्यमंत्री करोडपती असल्याची माहिती अगोदरच प्रसिध्द झाली आहे. मात्र यातील 43 टक्के मुख्यमंत्र्यांवर विविध गुन्हे दाखल असल्याची नवी माहितीही आता समोर आली आहे.
13 मुख्यमंत्र्यांवर विविध गुन्हे असून दाखल गुन्ह्यांच्या संख्येनुसार तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या विरोधात सगळ्यांत जास्त 101 गुन्हे दाखल आहेत. तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या विरोधात 57, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर 73, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 19 गुन्हे दाखल आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर 16, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुख्खु यांच्यावर 5, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्यावर 3, मिझोरमचे जोरमथांगा यांच्यावर 5, केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्यावर 4, सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्यावर 2, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर 3 तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत.
उत्तर प्रदेशातील आमदार पहिल्या स्थानावर
गुन्हे दाखल झालेल्या आमदारांच्या संख्येत उत्तर प्रदेश पहिल्या स्थानावर आहे. या राज्यातील 403 पैकी 51 टक्के आमदार अर्थात 205 जणांच्या विरोधात विविध गुन्हे दाखल आहेत. यातील 158 अर्थात 39 टक्के आमदारांवर हत्या, हत्येचा प्रयत्न, बलात्कार, अपहरण आदी गंभीर गुन्हे आहेत.
ज्या पाच आमदारांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे त्यातील तीन जण समाजवादी पक्षाचे आमदार आहेत व अन्य दोघे भारतीय जनता पार्टीचे आहेत. गंभीर गुन्हे दाखल आमदारांच्या संख्येत भाजप पहिल्या स्थानावर आहे. या पक्षाच्या 90 आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. समाजवादी पक्षाच्या 48, कॉंग्रेस पक्षाच्या दोन तर बहुजन समाज पक्षाच्या एका आमदारावर गुन्हा दाखल आहे. यातील काही आमदारांवर तब्बल 87, काही आमदारांवर 10 तर काही आमदारांवर 2 गुन्हे दाखल आहेत.