इस्लामाबाद – तालिबानने दक्षिण अफगाणिस्तानमधील मुलींसाठीच्या शिक्षण संस्था बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या या शिक्षण संस्तांना बिगर सरकारी गटांच्या मदतीने चालवण्यात येत आहेत. तालिबानने मुलींसाठी इयत्ता सहावी नंतरच्या शिक्षणावर यापूर्वीच बंदी घातली आहे.
तालिबानच्या शिक्षण मंत्रालयाने हेमंड आणि कंदहार प्रांतांना याबाबतचे आदेश दिले आहेत. मुलींसाठीच्या शिक्षण संस्थांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी कमिटी नियुक्त करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. या शिक्षण संस्था बंद करण्यासाठी तालिबानच्यावतीने कोणतेही स्पष्टिकरण देण्यात आलेले नाही. मात्र पुढील सूचना मिलेपर्यंत मुलींसाठीच्या शिक्षण संस्था बंद करण्याचे आदेश मिळाल्याच्या वृत्ताला कंदहार प्रांतातील शिक्षण विभागाच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला आहे.
लोकांनीच या शिक्षण संस्थांबाबत तक्रारी केल्यामुळे हा निर्णय गेण्यात आल्याचे या प्रवक्त्याने सांगितले. हेमंड प्रांतातील 2 स्वयंसेवी संघटनांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विद्यापिठांमध्ये मुलींच्या शिक्षणाला यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक क्षेत्रांमध्ये कोठेही नोकरी करण्यासही महिलांना मज्जाव करण्यात आला आहे.