निमसाखरच्या महिलांचा इंदापूरात आक्रोश ः तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे सुरू
रेडा -निमसाखर (ता. इंदापूर) गावातील शेकडो नागरिकांचे प्रपंच दारूच्या आहारी गेल्यामुळे बरबाद झाले आहेत. याबाबत अनेक वेळा पोलीस प्रशासनाकडे दाद मागून देखील येथील दारू विक्री बंद होत नाही. गावातील अवैध दारू विक्री कायमची बंद करावी या मागणीसाठी गावातील शेकडो महिलांनी इंदापूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
याबाबत निमसाखर गावातील शेकडो महिला पुरुष आणि भारत मुक्ती मोर्चा तसेच युनिट निळं वादळ ग्रुप निमसाखर यांच्यावतीने वालचंदनगर पोलीस निरीक्षक यांना यासंदर्भात नुकतेच निवेदन देण्यात आले आहे. दारू विक्री बंद न झाल्यास आंदोलन केले जाईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला होता. त्याप्रमाणे लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली होती.
मात्र प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे गावातील शेकडो महिलांनी इंदापूर तहसील कार्यालयासमोर मंगळवारी (दि. 11) सकाळी 11 वाजल्यापासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. बुधवारी (दि. 12) निमसाखर भागातील शेकडो महिलांनी या आंदोलनाला पाठिंबा देत गावातील अवैध दारु विक्री बंद झालीच पाहिजे, अशी मागणी लाऊन धरत बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
इंदापूर पोलिसांनी अवैद्य दारू धंद्यांवर काहीही कारवाई केली नसल्याने त्यांच्या विरोधामध्ये बेमुदत उपोषण धरले आहे. पोलीस अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा सूचक इशारा भारत मुक्ती मोर्चा निमसाखर युनिटचे पदाधिकारी दया भोसले यांनी दिला आहे.
निमसाखर गावातील शेकडो तरुण मुले व पुरुष दारूच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे अनेक महिलांचे संसार उध्वस्थ झाले आहेत. अनेक पुरुष, महिलांना दारू पिऊन मारतात. त्यामुळे येथील अनेक महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आमच्या गावातील दारू त्वरीत बंद करावी, अन्यथा आम्ही बेमुदत धरणे आंदोलन सोडणार नाही, असे आंदोलकांनी यावेळी सांगितले.
मी मंगळवारी शासकीय कामानिमित्त बाहेर असल्याने माझ्याकडे आंदोलनकर्त्यांचे निवेदन पोहोचले नाही. दारू बंदी करणे पोलिसांचे काम असून, मी कार्यालयात पोहोचल्यानंतर इंदापूर पोलिसांना या संदर्भात ठोस कारवाई करण्याचे कळविले आहे. –सोनाली मेटकरी, तहसीलदार