नवी दिल्ली – एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी अनुसूचित आयोगाकडे आपल्या जातीच्या संबंधातील कागदपत्रे सादर केली. आपण हिंदू महार जातीचे असून त्याची योग्य व वैध प्रमाणपत्रे आपल्याकडे आहेत, असे त्यांनी आयोगाला सांगितले.
आयोगाने त्यांच्याकडे ही कागदपत्रे मागितली होती. त्यानुसार त्यांनी ती अनुसूचित आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांच्याकडे सादर केली. आपल्या दाव्याची लवकरच चौकशी करून अध्यक्ष या विषयी निर्णय देतील, असे वानखेडे यांनी सांगितले.
यावेळी वानखेडे रोज होणाऱ्या आरोपांनी अत्यंत भडकलेले होते. ते म्हणाले,’सर आम्हाला न्याय द्या. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न होत आहे.आमच्या कुटुंबाची बेइज्जती केली जात आहे. माझ्यावर दबाव आणला जात आहे. त्यामुळे आम्हाला न्याय द्या, अशी मागणी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी केली.’
ते पुढे म्हणाले,’मी दलित समाजातून येतो. हे लोक नेहमीच बेइज्जती करण्याचं काम करत आहेत. मला बोगस आहे असे म्हणतात. बोगस याचा अर्थ काय होतो सर…? मला बेइज्जत केलं जात आहे. माझा युनिफॉर्म काढून घेणार, माझी नोकरी हिरावून घेणार… असं धमकावलं जात आहे. असं म्हणत समीर वानखेडे यांनी संताप व्यक्त केला.