पुणे : चवीने गोड, लाल रंगाच्या सिमला सफरंदाची आवक मार्केट यार्डात हिमालच प्रदेश येथून सुरू झाली आहे. सध्या तुरळक प्रमाणात आवक होत असून, 15 ऑगस्टनंतर ही आवक वाढेल, अशी माहिती व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.
हिमाचल प्रदेश येथील बागेतून थेट 4 ते 5 दिवसात ग्राहकांच्या हातात हे सफरचंद येते. परिणामी, परदेशातून येणाऱ्या सफरचंदापेक्षा ताजे असतात. सफरचंद आरोग्यास गुणकारी असतो. त्यामुळे नागरिक या सफरचंदाची आवर्जून वाट पाहत असतात. करोनाच्या परिस्थिती, सध्या श्रावण महिन्यात व्रतामुळे तर सफरचंदाला विशेषत: जास्त मागणी आहे. ऑगस्टमध्ये सुरू झालेला हंगाम नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू असतो. सध्या आवक सुरू झाली आहे.
फळ विभागातील घाऊक बाजारात 25 ते 30 डझनाच्या पेटीस दर्जानुसार 1 हजार 800 ते 4 हजार 200 रुपये भाव मिळत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा भाव किंचितसा जास्त आहे. आवक वाढल्यानंतर भावात घसरण होईल, असे अरविंद मोरे यांनी म्हटले आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे यंदा हिमालच प्रदेश येथून बाजारात सफरचंद नेहमीप्रमाणे येईल का, अशी शंका नागरिकांमध्ये निर्माण झाली होती.
मात्र, आता वाहतुक चांगल्या पध्दतीने सुरू झाली आहे. त्यामुळे मालाची आवक होणार असून, काही व्यापारी हिमालच प्रदेश येथे जावून मालाची पाहणीही करून आले आहेत. त्यामुळे करोनाचा आवकवर परिणाम होणार नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.