पुणे : वडगाव पुलावर सोमवारी रात्री एका ट्रक चालकास लूटण्यास आले. दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी ट्रकला गाडी आडवी लावून हा गुन्हा केला. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी तातडीने शोध घेत एका आरोपीस जेरबंद केले आहे.
मनजीत बच्चालाल साह (34,रा.उत्तरप्रदेश) यानी दिलेल्या फिर्यादीनूसार तीन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील उमेश रमेश जगधणे (30,रा.बिबवेवाडी गावठाण) याला अटक करण्यात आली आहे. तो बिगारी काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याकडून एक लोखंडी कोयता, दुचाकी आणि काही रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी हा नाशिक येथील राजश्री ट्रान्सपोर्टमध्ये चालक म्हणून काम करत आहे. तो सोमवारी रात्री अडीचच्या सुमारास नऱ्हे येतील वडगाव उड्डाणपुलावरुन ट्रक घेऊन चालला होता. यावेळी स्कुटीवरुन आलेल्या तीघांनी व आरोपी उमेश याने त्याची दुचाकी फिर्यादीच्या ट्रकला आडवी घालून ट्रक थांबवला.
फिर्यादीने ट्रक थांबवल्यावर आरोपींनी त्याला दमदाटी करत सोन्याचे लॉकेट, रोख रक्कम आणि वाहन परवाना असा 4200 रुपयांचा ऐवज घेउन पळ काढला. यानंतर फिर्यादीने पोलिस स्टेशन गाठले असता, सिंहगड पोलिसांनी सकाळपर्यंत तपास करत उमेश यास ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक व्ही.जे.महांगडे तपास करत आहेत.
महामार्गावर ट्रक चालकांस शस्त्राचा धाक दाखवून लूटण्याच्या घटना मागील काही महिण्यांत वाढलेल्या आहेत. ट्रकमध्ये लोड असल्याने ट्रकचा वेग कमी असतो, तसेच मध्यरात्री उड्डाणपुलावर तुरळकच वाहतूक असते. याचा फायदा घेत ट्रक चालकांना शस्त्राचा धाक दाखवून लूटले जाते. रात्री 2 ते पहाटे 5 दरम्यान अशा घटना घडल्या आहेत.