पुणे : मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला विभागातील आडत्यांवर बाजार समिती प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. दोनदा मुदतवाढ देऊनही बाजार समितीच्या सुचनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या 116 डमींवर कारवाई करून जीएसटीसह 1 लाख 38 हजार 880 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि.1) एका दिवसात ही कारवाई करण्यात आली. उद्याही (बुधवारी) कारवाई करण्यात येणार आहे.
मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला विभागात डमी आडत्यांची संख्या वाढली आहे. आडत्यांकडून माल खरेदी करून डमींकडून त्याची दुबार विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीमालाला कमी भाव मिळत आहे. या परिस्थिती नवनिर्वाचित संचालक मंडळाने एका गाळ्यावर दोन डमी ठेवण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचे प्रतिज्ञापत्र 500 रुपयांच्या स्टॅम्पवर देण्याच्या सुचना आडत्यांना दिल्या आहेत. यास आडत्यांनी विरोध केला. सुरूवातील बाजार समितीने दिलेल्या मुदतीमध्ये एकाही आडत्याने प्रतिज्ञापत्र दिले नाही. त्यानंतर आडते असोसिशनच्या सुचनेनुसार 31 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र देण्यास मुदतवाढ देण्यात आली. या कालावधीतही केवळ 18 आडत्यांनीच प्रतिज्ञापत्र दिले होते. या पार्श्वभूमीवर बाजार समितीने हे कारवाईचे पाऊल उचलले आहे.
“बाजार समितीच्या सुचनेनुसार प्रतिज्ञापत्र न दिलेल्या 116 आडत्यांवर आज (मंगळवार दि. 1) कारवाई करण्यात आली. बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांच्या सुचनेनुसार ही कारवाई करण्यत आली. उद्याही (बुधवार) ही कारवाई करण्यात येणार आहे.”
– महेंद्र काळभोर, विभागप्रमुख, फळे-भाजीपाला, पुणे बाजार समिती, पुणे
कारवाई सुरू होताच प्रतिज्ञापत्र देण्यास सुरूवात
बाजार समितीने दोनदा मुदत दिल्यानंतरही केवळ 18 आडत्यांनी प्रतिज्ञापत्र दिले होते. मात्र, मंगळवारी (दि.1) कारवाईचा बडगा उगारताच आडत्यांनी बाजार समितीकडे प्रतिज्ञापत्र देण्यास सुरूवात केली. दिवसभरात तब्बल 78 जणांनी प्रतिज्ञापत्र दिले. आतापर्यंत बाजार समितीकडे 96 प्रतिज्ञापत्र देण्यात आली आहे. उद्या (बुधवार दि. 2) मोठ्या संख्येने आडते प्रतिज्ञापत्र देतील, असा अंदाज आहे.