दिवाळी उत्सवात श्री लक्ष्मीच्या स्वागतासाठी रांगोळी रेखाटताना कर्वेनगर येथील रहिवासी संपदा हुद्देदार.
पुणे – दिवाळीतील नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन रविवारी साजरा करण्यात आला. घरोघरी आणि व्यापाऱ्यांनी सायंकाळी श्री लक्ष्मी पूजा करून फटाक्यांची आतषबाजी केली. पहाटे अभ्यंगस्नान करून फराळ आणि देवदर्शन असा माहौल शहरात होता. दिवाळीतील लक्ष्मी पूजन हे घरोघरी आणि व्यापाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी व्यापारी व्यापार वृद्धीसाठी श्री लक्ष्मीकडे प्रार्थना करतात.
मार्केटयार्ड, लक्ष्मी रस्ता तसेच प्रमुख बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांनी सायंकाळी लक्ष्मीपूजन केले. सकाळीच दुकानांसमोर रांगोळ्या काढण्यात आल्या. दोन दिवसांपूर्वीच विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. सहकुटुंब आणि दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह व्यापाऱ्यांनी लक्ष्मीपूजन केले. त्यानंतर कर्मचारी वर्गाने फटाक्यांची आतषबाजी केली.
मार्केटयार्डमध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर वजनमापाचे पूजन
पाडव्याच्या मुहूर्तावर व्यापारी वजनमापे आणि वजनकाट्यांचे पूजन करतात. मंगळवारी सकाळी 11 वाजेपासून हा मुहूर्त आहे. या दिवशी वजनमापे आणि काट्याचे पूजन करून ठराविक व्यापाऱ्यांना मुहूर्ताचा माल पाठवून दिला जातो. तसेच, या मालाची नव्या वहीत नोंदणी केली जाते. तसेच, मुहूर्ताच्या मालासोबत व्यापाऱ्यांकडून मिठाई पाठवण्याची प्रथा आहे, अशी माहिती “दी पूना मर्चंट्स चेंबर’चे अध्यक्ष आणि व्यापारी राजेंद्र बाठिया यांनी दिली.