स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने लावला बारा गुन्ह्याचा छडा
शिक्रापूर – शिक्रापूर ता. शिरुर सह रांजणगाव एमआयडीसी, शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सायलेन्सर चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या चोरट्यांचा पर्दाफाश बारा सायलेन्सर चोरांच्या मुसक्या आवळत या टोळीचा म्होरक्या शाहनुर मुनेर शेख या आरोपीला जेरबंद करत शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
शिक्रापूर ता. शिरुर सह अनेक ठिकाणी मारुती इको कार वाहनांचे सायलेन्सर चोरीला जाण्याच्या घटना घडत होत्या. या चोऱ्यांमुळे वाहन चालक देखील त्रस्त झाले होते. अनेक घटना घडत असताना सदर गुन्हे करणारे आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील एक गॅरेज चालक त्याच्या साथीदारांच्या मदतीने गुन्हे करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली त्यांनतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुषार पंदारे, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, राजू मोमीन, पोलीस नाईक योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे यांनी शिरुर परिसरात सापळा रचत दुचाकीहून आलेल्या गॅरेज चालक शाहनुर मुनेर शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने त्याच्या समीर रशीद सय्यद व आकाश संजय भंडलकर या दोघा साथीदारांच्या मदतीने सायलेन्सर चोऱ्या करुन ते सायलेन्सर माजीद खान याला विक्री करत असल्याचे सांगितले.
दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शहानुर मुनेर शेख वय २२ वर्षे रा. राळेगण थेरपाळ ता. पारनेर जि. अहमदनगर याला त्याच्या ताब्यातील दुचाकी सह अटक केली, असून पोलीस समीर रशीद सय्यद व आकाश संजय भंडलकर दोघे रा. राळेगण थेरपाळ ता.पारनेर जि.अहमदनगर तसेच माजीद खान रा. पुणे याचा शोध पोलीस घेत असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.
आरोपी कडून बारा गुन्हे उघड
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केलेल्या आरोपीच्या टोळी कडून शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सात, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक, शिरुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चार असे बारा गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.