ओतूर – करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ओतूर (ता. जुन्नर) येथील आठवडे बाजार बंद ठेवला होता, त्यामुळे नेहमी वर्दळ असलेल्या बसस्थानक परिसरात सन्नाटा पसरला होता. परिसरातील बाजारकरूंना काहीअंशी त्रास सहन करावा लागला आहे. हा खबरदारीचा उपाययोजना राबविल्या जात आहेत. जनजागृतीपर सूचना दिल्या जात असल्याने बाजार बंद आहे.
बाजार बंद असल्यामुळे सुमारे 10 ते 15 लाख रुपयांचा फटका बसला आहे. सायंकाळी 4 वाजेपर्यंत काही जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू होती. यानंतर पोलिसांनी दवंडीवजा सूचना देऊन दुकाने बंद ठेवण्यात आली. ओतूर बसस्थानकात तर प्रवाशांची अगदी तुरळक गर्दी दिसत होती. एसटी बसेसजवळ रिकाम्या धावत असाव्यात की काय, पण बसस्थानकात शुकशुकाटच जाणवत होता.
आळेफाटा येथे व्यापारी, दुकानदार यांनी देखील उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवली होती. तसेच गजबजलेला आळेफाटा परिसर व बसस्थानक देखील शांत शांत वाटत होते.व्यापारी बाजारपेठ असल्याने येथे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र, गर्दी न करण्याच्या सूचना देखील पोलिसांनी दिल्या.