रावणगाव – खडकी (ता. दौंड) येथील ब्राईट फ्युचर इंग्लिश मीडियम स्कूल येथे रविवारी (दि. 29) जिल्हास्तरीय “मायमराठी’ हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात पार पडली.
या स्पर्धेमधे प्राथमिक, माध्यमिक, इंग्रजी माध्यम अशा विविध शाळांमधील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सुंदर हस्ताक्षर ही प्रयत्नसाध्य कला आहे. सुंदर अक्षरामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त लागते, एकाग्रता वाढते, तसेच व्यक्तिमत्वाचा विकास होतो. विद्यार्थ्यांना वाचन व लेखनाची आवड लागते.
विचार करण्याची क्षमताही दृढ होते म्हणून ही कला आत्मसात करण्यासाठी मनाचा ठाम निश्चय हवा, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये 1 ली ते 8 वी च्या वर्गातील विविध शाळांतील 150 पेक्षा अधिक विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
अशी स्पर्धा दरवर्षी घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी शाळेकडे केली. संस्थेचे संस्थापक राजू विनायक गायकवाड, खजिनदार तुषार काळे, स्कूलचे प्राचार्य पांडुरंग काळभोर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रा. संतोष भांडवलकर यांनी नियोजन केले होते.