पुण्यात हॉटेल, लॉजचे ‘शटर डाऊन’च

दोन दिवसांत निर्णय घेणार : पालिका आयुक्त

पुणे(प्रतिनिधी) : राज्यशासनाने हॉटेल आणि लॉज सुरू करण्यासाठी सशर्त परवानगी दिली असली तरी, पुण्यात मात्र, हॉटेल आणि लॉकचे शटर आणखी दोन ते तीन दिवस डाऊनच असणार आहे. शहरात दिवसें दिवस नवीन बाधितांचा आकाडा वाढत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यासाठी सर्व यंत्रणांची पुढील दोन दिवसात संयुक्त बैठक घेऊन अंतीम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

शहरातील हॉटेल आणि लॉज 8 जुलै पासून सुरू करण्यास राज्यशासनाने मान्यता दिली आहे. मात्र,त्याच वेळी रूग्णांची संख्या लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार संबधित यंत्रणांना दिले आहेत. त्यामुळे पुण्याबाबतचा निर्णय महापालिका आयुक्त घेणार आहेत. मात्र, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे करोना बाधित आढळल्याने पालिका आयुक्त मागील तीन दिवसांपासून सेल्फ क्वारंटाईन आहेत. त्यामुळे अद्याप शासनाच्या या निर्णयाबाबत जिल्हा प्रशासन तसेच पोलीस यंत्रणेशी त्यांची कोणतीही बैठक झालेली नाही. तसेच पुण्यात करोनाचे रूग्ण वाढत असताना कोणत्या अटी आणि नियमांनुसार, ही मान्यता द्यायची याबाबतही अद्याप चर्चा झालेली नाही. त्यामुळे, पुण्यात हे दोन्ही व्यावसाय सुरू करण्यासाठी आणखी दोन दिवसांनी निर्णय घेण्यात येणार असल्याचे आयुक्त गायकवाड यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारी निर्णयाची शक्‍यता ?

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर शुक्रवारी होणाऱ्या आढावा बैठकीत पुण्यातील करोनाच्या स्थितीबाबत थेट नाराजी व्यक्त केली होती. मुंबईत करोना नियंत्रणात येतो पुण्यात का नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाकडून शहरात लॉकडाऊनच्या नियमांची कडक अमंलबजावनी सुरू केली आहे. त्यातच, आता लॉज आणि हॉटेल सुरू झाल्यास शहरात गर्दीची ठिकाणे वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे या आठवडयात शुक्रवारी होणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीतच त्यांच्याशी चर्चा करून पुण्यातील हॉटेल बाबत निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.