‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’ करणार ऑनलाईन गणेशोत्सव साजरा

पुणे – श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट ‘ नेही यंदाचा गणेशोत्सव ऑनलाईन साजरा करणार असल्याचे मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी ही माहिती दिली. उत्सवाचे हे १२९ वे वर्ष आहे.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, सचिव दिलीप जावळे, उपाध्यक्ष बाळासाहेब निकम आदी उपस्थित होते

करोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सव साधेपणाने करणार हे आधीच जाहीर केले होते. त्यामुळे आगळ्या वेगळ्या पद्धतीने तो साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, त्या उद्देशानेच ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव करण्याचा निर्णय घेतला आहे, असे बालन यांनी सांगितले.

श्री’ ची प्राणप्रतिष्ठा सभामंडपातच होणार आहे. परंतु बाप्पांचे दर्शन मात्र ऑनलाईन पाहता येणार आहे. बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना सालाबादप्रमाणे मंदिरा मध्ये होणार आहे. उत्सव मोठा नसला तरी सर्व धार्मिक विधी पारंपारिक पद्धतीने केले जाणार आहेत. बाप्पा’ च्या दर्शनासाठी गणेशभक्तांना मंदिरात,मांडवात प्रवेश दिला जाणार नाही, भाविकांना सांस्कृतिक नहोत्सवासह गणरायांच्या दर्शनाचा आणि आरतीचा लाभ फक्त ऑनलाईन घेता येणार आहे.

करोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता शहरातील गणेशोत्सव मंडळांनी उत्सव साधेपणाने आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून साजरा करावा तसेच पुणेकरांना सुद्धा घरातच सुरक्षित राहून उत्सव साजरा करावा, विसर्जन सुद्धा घरातच करावे असे आवाहन पुनीत बालन आणि ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

असा असणार आहे सांस्कृतिक महोत्सव

– 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या गणेशोत्सव दरम्यान हा ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सव होणार आहे.

– पुण्यासह जगभरातील गणेशभक्तांना घरबसल्या घेता येणार दिग्गज कलावंतांच्या मैफलींचा आस्वाद घेता येणार आहे.

– यामध्ये शंकर महादेवन, राहुल देशपांडे, पं. विजय घाटे, राकेश चौरसिया, डॉ. सलिल कुलकर्णी, नंदेश उमप, गणेश चंदनशिवे यांच्यासह लिटिल चॅम्प’ चा सहभाग असणार आहे.

– महापौर मुरलीधर मोहोळ, सह-पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, लेखक-दिग्दर्शक प्रविण तरडे आणि संगीतकार अजय-अतुल यांच्या मुलाखतीही होणार आहे.

या सांस्कृतिक महोत्सवाचे ऑनलाईन प्रसारण 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2020 दरम्यान श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, पुणे या http://www.shrimantbhausahebrangariganpati.com/ या अधिकृत संकेतस्थळावर होणार आहे. हा सांस्कृतिक महोत्सव सर्व गणेशभक्तांना विनामूल्य अनुभवता येणार आहे. यामुळे गणेशभक्तांनी घरी सुरक्षित राहून या महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन पुनीत बालन यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.