प्रत्यक्ष राजमाता जिजाऊ आणि बालशिवबांनी सोन्याचा नांगर फिरवून पुण्यनगरी वसवली. याच ऐतिहासिक पुण्यनगरीतील शिवाजीनगरच्या परिसरात श्री सद्गुरू जंगली महाराज मंदिराशेजारी पाताळेश्वर लेणी आहेत. हिरवी वृक्षराजी या प्राचीन लेण्यांवर छाया धरत आहे.
पुरातन वटवृक्ष, कुंकुमवर्णी गुलमोहर आणि हिरव्यागार बगीच्यामध्ये पक्ष्यांची किलबिल ऐकत हे सुंदर कातळशिल्प उभे आहे. हे शिवालय राष्ट्रकूट राजवटीच्या काळात आठव्या शतकाच्या सुमारास जमिनीच्या खाली लेण्याच्या स्वरूपात खोदून घडवले आहे. म्हणून याला पाताळेश्वर म्हणतात. हा एक स्थापत्यशास्त्रातील अद्भूत आविष्कार आहे.
या परिसरात मध्यभागी वर्तुळाकार नंदीमंडप दिसतो. त्याचे विशाल छत जाड कातळात घडवलेले आहे. हा मंडप चौरसाकृती सुंदर कोरीव स्तंभावर तोललेला आहे. मंडपात नंदी विराजमान आहे. या मंडपाच्या आत आणखी एक वर्तुळ आहे, तिथेही एक नंदी आहे. समोर तीन गर्भगृहे आहेत.
मधल्या गर्भगृहात शिवमंदिर आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर सुंदर कोरीव काम आहे. मूळ पाषाणातील शिवलिंगावर पितळेचे शिवलिंग आणि त्यावर छाया धरणारा पितळेचा नागराज या दर्शनाने मन प्रसन्न होते. गूढ शांतीचा अनुभव प्रत्ययाला येतो. येथे सुबक, चौरसाकृती स्तंभांचा प्रदक्षिणा मार्ग आहे. प्रकाश किरणांचा सुंदर खेळ येथे पाहण्यास मिळतो.
गर्भगृहाच्या भिंतीवर शिवाचे आणि त्रिपुरासूर वधाचे शिल्प आहे. माता लक्ष्मी, पार्वती, भैरव यांची सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. तसेच एक शिलालेख आहे. मंदिरात श्रीराम, सीता, लक्ष्मण, वीर हनुमान, माता लक्ष्मी, श्रीगणेश आदी दैवतांच्याही मूर्ती आहेत. त्रिपुरी पौर्णिमेला संपूर्ण मंदिर दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघते.
– माधुरी शिवाजी विधाटे