नेवासा, (प्रतिनिधी) – नेवासा येथील जुन्यापेठेत असलेल्या श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी उत्सवाला दासबोध ग्रंथ पारायणाने शुभारंभ करण्यात आला. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचा उत्सव ९ दिवस चालणार आहे.
श्रीराम नवमी उत्सवाच्या निमित्ताने दि.१० ते दि.१६ एप्रिल या कालावधीत सकाळी ७ ते १० यावेळेत दासबोध ग्रंथांचे पारायण होत असून श्री क्षेत्र जांब समर्थ येथील श्री समर्थ भक्त माणिकराव राठोड हे या पारायणाचे व्यासपीठ नेतृत्व करत आहे. दि.११ ते दि.१५ एप्रिल पर्यंत दररोज रात्री ८ ते १० यावेळेत जांब समर्थ येथील हभप बाळासाहेब महाराज नाईक यांचे कीर्तन होणार आहे.
दि.१६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते ८ यावेळेत समर्थ भक्त गायिका माधुरी कुलकर्णी यांचे श्री गणपती आख्यान होणार आहे. दररोज दुपारी ४.३० ते ५ व सायंकाळी ६ ते ८ यावेळेत नेवासा येथील महिला मंडळाच्या वतीने श्रीराम रक्षा स्तोत्र पठण, दि.१२ एप्रिल रोजी गायनाचार्य कृष्णाजी डहाळे यांचा अभंगवाणीचा कार्यक्रम होणार आहे.
दि.१३ एप्रिल रोजी नेवासा येथील श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज उपासना केंद्राच्या वतीने उपासना, नामस्मरण, सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते ८ यावेळेत स्वर माधुरी गायन ग्रुप प्रस्तुत भक्तीरंग कार्यक्रम माधुरी कुलकर्णी व सहकारी सादर करणार आहे.
दि.१५ एप्रिल रोजी स्वाध्याय परिवाराचे प्रेरक पांडुरंगशास्त्री आठवले(दादाजी)यांचे व्हिडीओ प्रवचन होणार असून दि.१६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता दासबोध ग्रंथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. दि.१७ एप्रिल रोजी रामनवमीच्या निमित्ताने हभप बाळासाहेब महाराज नाईक यांचे सकाळी १० ते १२ यावेळेत श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन व महाप्रसादाच्या वाटपाने प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा होणार आहे. श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाचा व कीर्तन श्रवणाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट व भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.