आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी आहे. गणरायाचे आगमन होत आहे. आज गणरायाची प्रतिष्ठापना केली जात आहे. गणरायाची प्रतिष्ठापना करण्याविषयी जाणून घेऊ या.
आज गणरायाच्या प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त सकाळी आहे. त्यामुळे दिवसभरात तुम्ही कधीही गणेशाची प्रतिष्ठापना करू शकता.
मात्र गणरायाची पूजा शक्यतो सकाळच्या वेळेसच केली जाते. गणपती बाप्पाची मूर्ती कापडाने झाकून ढोल-ताशांच्या गजरात घरी आणली जाते. दारात मूर्तीचे पाय धुऊन अक्षता अर्पण करून प्रवेश केला जातो. त्यानंतर पाटावर मूर्तीची स्थापना केली जाते. स्थापनेपूर्वी पाटावर लाल वस्त्र अंथरून त्यावर मूर्ती ठेवली जाते. घरातील मंडळी गणरायाची पूजा करतात. आरती करून घरी बनवलेल्या पक्वान्नाचा विशेषत: मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो.
दीड, पाच, सात आणि दहा दिवस गणरायाची सेवा केली जाते. या दिवसांमध्ये रोज बाप्पाची पूजा केली जाते. सकाळ-संध्याकाळ आरती होते. रोज गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. गणेशोत्सव दहा दिवस चालतो.
पूजा, आरती, नैवेद्य, भजन असे आनंदी आणि मंगलमय वातावरण असते. या आनंदात कुटुंबातील लहान मोठे तसेच समाजातील सर्व लोक सहभागी होतात.