पिंपरी -गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी गणेशभक्तांची गणेश पूजनासाठी गुरुजी मिळविण्याकरता धावपळ सुरू होती. अनेकांना फोन करुन आणि समाज माध्यमांवर मॅसेज करुन गणपती पूजन करण्यासाठी गुरुजी मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळाले.
दरवर्षीच गुरुजी शोधण्यात अडचणी निर्माण होतात. परंतु गेल्या दीड वर्षांत करोनाकाळात पूजा आदी ठप्प पडल्याने अनेक गुरुजींवर उपासमारीची वेळ ओढावली होती. यामुळे अनेकांनी पौरोहित्य सोडून इतर नोकरी-व्यवसायास प्राधान्य दिले. परिणामी सध्या उपलब्ध असलेल्या गुरुजींनी यजमानांपुढे आता ऑनलाइन पूजनाचा पर्याय ठेवला आहे.
महाराष्ट्राचा लोकोत्सव मानल्या जाणाऱ्या गणेशोत्सवात घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. प्रत्येक ठिकाणी पूजा करण्यासाठी गुरुजी मिळणे जवळपास अशक्य असते. त्यामुळे दरवर्षीच गुरुजी शोधणे हा एक मोठे आव्हान ठरते. परंतु यंदा तर गुरुजी शोधणे खूपच अवघड झाले आहे.
त्यातच करोनाकाळ असल्याने अनेकजण ऑनलाइन पूजनालाच प्राधान्य देत आहेत. परंतु काहीजणांची श्रद्धा असते की गुरुजींनी स्वत: उपस्थित राहून त्यांच्या लाडक्या बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी. यामुळे गुरुजींनाही एका दिवसात दहा ते पंधरा पूजा कराव्या लागणार आहेत.
उपलब्ध करून दिले पर्याय
सध्याची परिस्थिती लक्षात घेता अनेक गुरुजींनी भक्तांना घरीच पूजा करता यावी, अशा पद्धतीची सामग्री तयार करुन ठेवली आहे. पूजा सामग्री, पूजा मांडण्याची पद्धत, मंत्र आणि त्याचा अर्थ, तो मंत्र म्हणत असताना करावयची विधी हे सर्व लिहून त्याच्या पीडीएफ तयार करुन सोशल मीडियावर पाठविण्यास सुरुवात केली आहे. तर काही गुरुजींनी आपल्या वेबसाइट आणि यू ट्यूब चॅनलवर संपूर्ण पूजन अपलोड केले आहे. हे पाहून घरच्या घरी पूजा करता येऊ शकेल.
महिला पुरोहितांचाही सहभाग, ऐच्छिक दक्षिणा
यंदा ऑनलाइन पूजनासाठी महिला गुरुजींचाही पुढकार पहावयास मिळत आहे. काही महिला पुरोहित ऑनलाइन पूजन करुन देत आहेत. एकाच वेळी अनेक ठिकाणच्या पूजा त्या सांगण्यास तयार आहेत. तसेच काही महिला पुरोहित यांनी त्यासाठी ऐच्छिक दक्षिणा असा आगळा-वेगळा पर्याय ठेवला आहे.
प्रत्येक घरात गणरायाचे विधीवत पूजन व्हावे, दक्षिणेची रक्कम आड येऊ नये, असे काही महिला पुरोहितांनी दैनिक प्रभात शी बोलताना सांगितले. तसेच अन्यही काही गुरुजींनी आपला नोकरी व्यवसाय सांभाळत यजमानांची इच्छा आणि क्षमतेनुसार दक्षिणा घेत ऑनलाइन पूजनाची तयारी केली आहे.