हडपसर (विवेकानंद काटमोरे)- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पुणे शहर कार्यकारिणी गुरुवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये हडपसरला झुकते माप देण्यात आले आहे. पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी म्हणून माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी उपमहापौर निलेश मगर यांची तर विधानसभा अध्यक्षपदी डॉ. शंतनू जगदाळे यांची तसेच प्रवक्तेपदी नगरसेवक योगेश ससाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघात खासदार डॉ. अमोल कोल्हे तसेच आमदार चेतन तुपे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे असून नव्याने महापालिकेत आलेली गावेही राष्ट्रवादीसाठी पूरक असल्याने आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहर कार्यकारिणीत हडपसर विधानसभा मतदार संघाला झुकते माप देण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. अनेक माजी नगरसेवक,पंचायत समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनाही शहर कार्यकारिणीत सामावून घेण्यात आले आहे. आगामी विधानसभा व महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने हडपसरला झुकते माप देण्याबरोबरच विभागवार समतोल राखण्याचा प्रयत्नही केला आहे.
माजी नगरसेवक फारूक इनामदार, प्रशांत म्हस्के, माजी नगरसेविका विजया कापरे, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा वासंती काकडे तसेच हवेली पंचायत समितीचे संदीप तुपे, जतिन कांबळे, राहुल घुले यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच सरचिटणीसपदी राजेंद्र गारूडकर, उदयसिंह मुळीक, संजय लोणकर, शालिनी जगताप, रईस सुंडके, संजय गायकवाड, रामभाऊ कसबे, राजेश आरणे यांची वर्णी लागली आहे. तर संजय बबन घुले, प्रशांत घुले, योगेंद्र गायकवाड, दत्ता शिंदे, राहुल होले आणि संकेत कवडे यांना शहर चिटणीस म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
शहराचे संघटक सचिव यापदी प्रदीप मगर, निलेश घुले, संजय शिंदे, महेश सातव,अन्वर शेख, सुशीला गुंजाळ व हेमंत बधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय सेवादल अध्यक्षपदी येथील योगेश जगताप यांची तर कार्यकारिणी सदस्य मोहमद्दीन खान, सागरराजे भोसले, गणेश भोईटे यांची नियुक्ती केली आहे. शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज जाहीर केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शहर कार्यकारणीत हडपसर मतदार संघातील या पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आल्याने हडपसरला झुकते माप दिले असल्याचे स्पष्ट होत आहे.
पुणे शहरातील आठही मतदार संघात तुलनेने हडपसर विधानसभा मतदार संघ मोठा आहे. त्यामुळे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे या भागासाठी अधिकचे पदाधिकारी नियुक्तीसाठीचा आग्रह धरला होता. तशी या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची संख्याही अधिक आहे. त्यातूनही अधिकाधिक कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत हडपसर परिसरातून सर्वाधिक नगरसेवक हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निवडून आणण्यासाठी ही कार्यकारणी महत्वाची ठरणार आहे.
मतदार संघातील सर्वच कार्यकर्ते तोलामोलाचे आहेत. त्यातूनही सर्वधर्मीय सलोखा राखत कार्यकारिणीत आरक्षित घटकांसाठी सुमारे 56 टक्के व 44 टक्के सर्वसाधारण घटकांतील कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम या कार्यकारिणी निवडीतून केले आहे. यातूनही उर्वरित निष्ठावंत कार्यकर्त्याला पुढे संधी देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे.
– चेतन तुपे पाटील, आमदार, हडपसर विधानसभा