Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र आजारपणावर मात करत तो पुन्हा एकदा काम करण्यास सज्ज झाला आहे. लवकरच श्रेयस तळपदे महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात झळकणार आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. यात श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले यांच्या प्रमुख भूमिकेत असणार आहे. ‘ही अनोखी गाठ’च्या निमित्ताने महेश मांजरेकर आणि श्रेयस तळपदे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.
अभिनेता श्रेयस तळपदेने ‘ही अनोखी गाठ’ या सिनेमाचे पोस्टर शेअर करत ही घोषणा केली आहे. श्रेयसने सिनेमाचे पोस्टर शेअर करत लिहिले की, “नव्या वर्षाची सुरुवात एका नव्या कोऱ्या मराठी सिनेमाने… झी स्टुडिओज प्रस्तुत करीत आहेत, महेश मांजरेकर दिग्दर्शित एक नवी प्रेम कहाणी ‘ही अनोखी गाठ’. 1 मार्च 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित’.
View this post on Instagram
दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले, “झी स्टुडिओजसोबत या आधीही अनेकदा काम केले असून पुन्हा एकदा नवा चित्रपट घेऊन आलो आहे. श्रेयस आणि गौरी यांची केमिस्ट्री पाहणे औस्तुक्याचे ठरेल. हळूहळू चित्रपटातील गोष्टी समोर येतील.”.
दुसरीकडे, ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटाच्या माध्यामातून अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्यासोबत श्रेयस तळपदे देखील झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सई ताम्हणकर आणि श्रेयस तळपदे यांनी तब्बल 16 वर्षांनंतर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर केली आहे. सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटातील ‘दिल मे बजी गिटार’ हे गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटातील हे धमाल बॉलिवूड स्टाईल गाणे सई आणि सिद्धार्थवर चित्रित झालं असले तरी गाण्याच्या शेवटच्या कडव्यात श्रेयस तळपदेचीही एन्ट्री होते. या गाण्याला प्रेक्षकांची देखील चांगलीच पसंती मिळाली.