संगमनेर -मेधा महोत्सव-2023मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता श्रेयस तळपदे व अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांनी “अमृतवाहिनी’च्या विद्यार्थ्यांसमवेत सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत धमाल केली.
“अमृतवाहिनी’च्या मेधा मैदानावर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांवेळी संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख, डॉ. जयश्री थोरात, डॉ. हसमुख जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, “मेधा’चे समन्वयक प्रा. जी. बी. काळे, प्राचार्य डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, डॉ. बाबासाहेब लोंढे, प्रा. एस. टी. देशमुख, जे. बी. शेट्टी, शीतल गायकवाड, अंजली कण्णावार, प्रा.विलास शिंदे, प्रा. अशोक वाळे, नामदेव गायकवाड आदी उपस्थित होते.
सुरुवातीला भारत भूमीचा गौरव करणारी नाटिका सादर झाली. यानंतर भांगडा, बिहू नृत्य, संबळ नृत्य, गोंधळ याचबरोबर लहान मुलांच्या पारंपरिक वेशातील फॅशन शोने धमाल केली. तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या हॉरर शोने अंगावर शहारे आणले. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवछत्रपती काळाचे वर्णन करणाऱ्या पोवाड्याचे सादरीकरण करून दाद मिळवली. रामायण, महाभारतातील कथासह वेशभूषा हे आकर्षण ठरले. याचबरोबर डी. फार्मसी व बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या फ्युजन डान्सला प्रतिसाद मिळाला. तंत्रनिकेतनच्या फ्युजन सॉंगवर सिनेअभिनेता तळपदे व अभिनेत्री बेहेरे यांनी ठेका धरला.
या वेळी तळपदे म्हणाले की, जीवनात अभ्यासाबरोबरच व्यक्तिमत्व विकासासाठी तुमच्यातील गुण विकसित झाले पाहिजे. सर्वांगीण विद्यार्थी घडवण्याचे काम “अमृतवाहिनी’त होत आहे. हा परिसर आणि येथील वातावरण हे मनाला भारावून टाकणारे असल्याचेही ते म्हणाले. बेहेरे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील कलाकारांना संधी मिळाली, तर ते नक्कीच आपले नाव उज्ज्वल करतील. मला किंवा मुंबईच्या मुलींना “अमृतवाहिनी’सारख्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायला नक्की आवडेल, असेही त्या म्हणाल्या.