पिंपरी – कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने पिंपरी- चिंचवडकरांवर लादलेला जिझिया शास्तीकर माफ करण्याचा दिलेला शब्द शिवसेना-भाजपच्या युती सरकारने पाळला आहे. शहरवासीयांचे 460 कोटी 55 लाख रुपये शासनाने माफ केले आहेत. मागील अनेक वर्षांपासून जनतेच्या डोक्यावर असलेला बोजा कमी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शहरवासीयांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांचा शास्तीकर माफ केल्याचा अध्यादेश राज्य शासनाने 3 मार्च रोजी जारी केला. पिंपरी-चिंचवड शहरात पाच लाख 91 हजार 150 मालमत्ता आहेत. त्यापैकी 97 हजार 699 अवैध मालमत्तांना शास्तीकर लागू झाला होता. त्यातील एक हजार चौरस फुटापर्यंतच्या 60 हजार 83 अवैध मालमत्तांचा भाजप-शिवसेनेचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शास्तीकर माफ केला होता. चिंचवड विधानसभा निवडणुकीत पुर्णपणे शास्तीकर माफ करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यांनी अध्यादेश काढत दिलेला शब्द पाळला. या आदेशामुळे शहरातील 31 हजार 616 मालमत्तांवरील 460 कोटी 55 लाख रुपयांचा शास्तीकर पूर्णपणे माफ झाल्याचे शिवसेना उपनेते खा. श्रीरंग बारणे यांनी सांगितले. त्या निमित्त जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात येणार आहे.
भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर शास्तीकर माफीचा प्रश्न सोडवण्यासाठी मी सतत पाठपुरावा केला आहे. आमदार महेश लांडगे यांनी देखील विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शास्तीकर पूर्णपणे माफ केला जाईल, असे आश्वासन दिले होते. आचारसंहिता संपताच शासन आदेश काढण्यात आला असून दिलेले वचन सरकारने पाळले. प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावाचा प्रश्न देखील लवकरच निकाली निघेल.
– श्रीरंग बारणे, खासदार, मावळ लोकसभा.