नागनाथवाडी :नऊशे वर्षापुर्वीचे पुरातन शिवमंदीर.
प्रकाश राजेघाटगे
श्रावण महिना नुकताच सुरू झाला असुन, श्रावणातील सोमवारी महादेवांची पुजाअर्चा करण्याची परंपरा हिंदु धर्मियांमध्ये आहे. त्यानुसार उद्या पहिला श्रावणी सोमवार. त्यानिमित्त, जिल्ह्यातील शिव मंदिरांविषयी थोडसं जाणून घेताना…
पुसेगाव – खटाव तालुक्याच्या उत्तरेला ललगुणनजिक येरळा नदीच्या तीरावर गर्द वनराईने नटलेल्या परिसरात क्षेत्र नागनाथवाडी येथे नऊशे वर्षांपुर्वीचे पुरातन हेमांडपंथी जागृत व स्वयंभू शिवमंदीर आहे. येथील पवित्र स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनासाठी श्रावण माहिन्यातील प्रत्येक सोमवारी व शिवरात्रीच्या पर्वकाळात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
देशात अनेक शिवमंदिरे आहेत. मात्र, येथील शिवमंदिराचे एक वेगळेपण आहे. या मंदिरात दरवर्षी फक्त श्रावण महिन्यात बोटाएवढ्या जाडीच्या व एक फूट लांबीच्या बालरूपी नागराजाचे आगमन होते. हे शिवमंदीर पूर्वाभिमुख असून संपूर्ण बांधकाम घडीव दगडात आहे.
मंदीर प्रवेशासाठी दगडी कमानीचे प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या आवारात मेघडंबरी, दगडी चौथरा आहे. त्यावर नंदीच्या तीन आकर्षक मूर्ती आहेत. यामधील दक्षिणेकडील नंदी स्वयंभू आहे. चौथऱ्यासमोरच मुख्य मंदिराची तीन प्रवेशद्वारे आहेत. त्यातून पंचवीस फूट खोल असलेल्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी जाताना छोट्या दगडी पायऱ्या उतरून जावे लागते. लहान पायऱ्या उतरून दहा फूट खाली गेल्यानंतर फुटभर पाण्याने भरलेल्या छोट्या हौदात भाविकांचे पाय आपोआपच धुतले जातात. पंचवीस फूट खोल उतरल्यानंतर बैलगाडीच्या चाकाच्या आकाराचे स्वयंभू शिवलिंगाचे आपणास दर्शन होते.
हे शिवलिंग वर्षभर पाण्याखाली असते. श्रीनागनाथ हे राज्यातील लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असून बुध येथील राजेघाटगे संस्थानचे ते कुलदैवत आहे. बुध- पाचेगाव पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थांनी श्रमदानातून वर्षामध्ये महाराजांच्या सुचनेप्रमाणे सध्या दिसणारे नागनाथ मंदिर बांधले गेले आहे.