कराड – मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासात सुमारे 91 वर्षे आपले अढळ स्थान निर्माण केलेल्या दैनिक प्रभातने संस्कृती संपन्न आणि चारित्र्यवान पत्रकारितेचा आदर्श नेहमीच सर्वांसमोर ठेवला आहे. त्याच उद्देशाने चार वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यात पदार्पण करत कराड-पाटणमधील वाचकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रभातच्या कराड विभागीय कार्यालयाचा आज शुक्रवारी चौथा वर्धापन दिन मोठ्या दिमाखदार सोहळ्याने व मान्यवरांच्या शुभेच्छांनी संपन्न झाला.
निर्भिड, नि:पक्षपाती आणि संतुलित वृत्तांकन हे प्रभातचे वैशिष्ट्य आहे. याच उद्देशाने प्रभातने चार वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यात पदार्पण केले. वाचकांनीही प्रभातचे मनापासून स्वागत केले आहे. कराड-पाटण भागातील वाचकांना चांगली सेवा देता यावी, यासाठी कराड येथे सुरु करण्यात आलेल्या कराड विभागीय कार्यालयाचा चौथा वर्धापन दिन शुक्रवार दि. 18 रोजी मोठ्या दिमाखदार सोहळ्याने संपन्न झाला. याप्रसंगी कराड-पाटण तालुक्यातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून दैनिक प्रभातला शुभेच्छा दिल्या.
यामध्ये शेती मित्र अशोकराव थोरात, रयत क्रांती संघटनेचे प्रधेशाध्यक्ष शेतकरी
नेते सचिन शिंदे, अँड. वसंतराव मोहिते, अँड. जयवंतराव मोहिते, उत्तमराव मोहिते (फौजी), अतुल मुळीक, भाजपचे रामकृष्ण वेताळ, सुधीर एकांडे, अँड. संदीप कांबळे, शेतकरी संघटनेचे पाटण तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, सचिन पतील सर, नडशीचे माजी उपसरपंच भगवानराव थोरात, भारत थोरात, धन्वंतरी पतसंस्थेचे अर्जुन नांगरे आदी. मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
वर्धापन विशेषांकाचे मान्यवरांकडून कौतुक
दैनिक प्रभातच्या कराड विभागीय कार्यालयाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या विशेषांकाचे मान्यवरांनी कौतुक करून स्वागत केले. या पुरवणीच्या माध्यमातून कराड-पाटणची खऱ्या अर्थाने ओळख झाल्याच्या प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या. तसेच दै. प्रभातमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या दैनंदिन बातम्या, विविध विषयांवरील लेख मालिका, वेगळे विषय, मुलाखती आदींचेही मान्यवर, वाचकांनी कौतुक केले. तसेच दै. प्रभातच्या पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या.
वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार
दैनिक प्रभातच्या कराड विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात दैनिक प्रभातच्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या वृत्तपत्र क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.