सातारा – प्राथमिक शिक्षक सहकारी बॅकेच्या निवडणुकीसाठी उद्या शनिवारी जिल्ह्यातील 19 मतदान केंद्रांवर मतदान होत असून त्यासाठी प्रशासकीय पातळीवरुन सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदानासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून शुक्रवारी ही यंत्रणा केंद्रावर रवाना झाली.
प्रत्येक केंद्रावर दोन पोलिस कर्मचारी असा 38 पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतमोजणी रविवारी (ता. 20) छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे. सकाळी दहापर्यंत पहिला निकाल अपेक्षित असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शंकर पाटील यांनी सांगितले.
मतदानासाठी सहकार विभागाची यंत्रणा सज्ज असून शनिवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत मतदान होणार आहे. त्यासाठी 175 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून एका केंद्रावर नऊ ते दहा कर्मचारी असणार आहेत. एक शिक्षक सभासद सहा मते देऊ शकणार आहे. मतदानासाठी पाच मतपत्रिकांचा वापर होणार आहे.
यामध्ये सर्वसाधारणसाठी पांढरी, ओबीसी उमेदवारांसाठी फिक्कट हिरवी, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग उमेदवारांसाठी पिवळी, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्ग उमेदवारांसाठी फिक्कट निळी, महिला राखीवसाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका असेल. मतदानानतर मतपत्रिका छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमधील स्ट्रॉंग रुममध्ये ठेवल्या जातील. त्यानंतर रविवारी (ता. 20) सकाळी आठ वाजता मतमोजणी होणार आहे. एका वेळी दहा टेबलावर मतमोजणी होईल. पहिल्यांदा सर्व साधारणची मोजणी होईल. त्यामुळे सकाळी दहापर्यंत पहिला निकाल अपेक्षित आहे.