पालिका आयुक्तांनी घेतला आरोग्य अधिकाऱ्यांकडून आढावा
पुणे – करोनावर लस सापडली ना कुठला औषधाचा डोस; परंतु आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना करोनामुळे महापालिका आयुक्तांनी चांगलाच “डोस’ दिला. जागेवर जाऊन पाहणी किंवा काम न करता केवळ “ऑर्डर’ सोडणाऱ्या अधिकाऱ्यांना “काम दाखवा’, अशी थेट तंबी आयुक्त विक्रम कुमार यांनी बुधवारी आरोग्य विभागाच्या बैठकीत दिली.
करोना विषयक कामाचा डंका वाजविला जात असला तरी आयुक्त विक्रम कुमार यांनी आढावा घेतला तेव्हा अनेक अधिकारी नुसते “आदेश’च देत असल्याचे दिसून आले. प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणे, वेगवेगळ्या व्हिजीट देणे आणि अन्य महत्त्वाची कामे हे अधिकारी करतच नाहीत हे देखील त्यातून पुढे आले.
प्रत्येक अधिकाऱ्याच्या कामाचा विक्रम कुमार यांनी आढावा घेतला. तुम्ही आज, काल, परवा काय काम केले, कोठे व्हिजीट केली. कोणत्या सेंटरमध्ये गेलात, दवाखान्यात गेलात, कोणत्या रुग्णालयाची पाहणी केली, याची मला माहिती द्या, असेही ते म्हणाले; परंतु काहीजण माहिती देऊ शकले नाहीत. आता येथून पुढे रोजच्या रोज काय काम केले याचा अहवाल द्या, असा थेट आदेशच आयुक्तांनी आरोग्य विभागाला दिला आहे.
अधिकाऱ्यांना समजले का?
आयुक्तांनी घेतलेल्या आढावा बैठकीत काही विभागांतील अधिकारी त्यांचे काम दाखवू शकले नाहीत, तसेच माहितीही देऊ शकले नाहीत. केवळ, आदेश देऊन मोकळे होऊ नका तर दिलेल्या आदेशाचे पालन झाले आहे का, ते काम पूर्ण झाले आहे का? याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी करा, असे आयुक्तांचे म्हणणे आहे. पण, अधिकाऱ्यांना ते समजले का, हाच मोठा प्रश्न आहे.