प्लॅस्टिक बंदीच्या आदेशाला कोलदांडा !

देहुरोड बाजारपेठेत पिशव्यांचा सर्रास वापर; निवडणुकीनंतर कारवाई करण्याचे संकेत

देहुरोड  – देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाने प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी घातली असली तरीही सर्रासपणे प्लॅस्टिकचे पिशव्या, ग्लास, चमचे वापराने बोर्डाच्या आदेशाला हरताळ फासला आहे. राज्यात शहरात कॅरीबॅग आणि थर्माकोल बंदीला बऱ्यापैकी यश आले असले तरी कमी “मायक्रोन’च्या पिशव्या, प्लॅस्टिक बॉऊल, द्रोण, चमचे यांचा खुलेआम वापर सुरूच आहे. कागदी, कपड्यांचा वापर होण्याऐवजी प्लॅस्टिकचा वापर सुरू आहे.

किराणा दुकानदाराकडून अजूनही कमी “मायक्रोन’च्या पिशव्यातून धान्य, कडधान्य, मसाले व अन्य पदार्थांची विक्री सुरू आहे. तर कापड मार्केटमध्ये व्यापाऱ्यांकडून सर्रासपणे प्लॅस्टिकचा वापर केला जात आहे. परिसरातील मटन मार्केट, मासेविक्रेत्यांकडून कमी “मायक्रोन’च्या पिशव्यांचा वापर सार्वत्रिक होत आहे. प्लॅस्टिक कोटेड पत्रावळ्या-द्रोण विक्रीही सुरू आहे. मंगल प्रसंगी घरी व मंगल कार्यालयात जेवणावळी करणाऱ्या मंडळींकडून सर्रास याचा वापर केल्याचे दिसून येत आहे. हॉटेल्स, अमृततुल्य, स्नॅक सेंटर, आईस्क्रीम पार्लर, शीतपेय, ज्युस सेंटर आदी ठिकाणी प्लॅस्टिकचे ग्लास, कप्स, स्ट्रॉ, चमचे आदींचा सर्रास वापर होत आहे.

शासकीय तसेच अन्य विभागाकडून प्लॅस्टिक बंदीवर कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही. कॅंटोन्मेंट बोर्डाने प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेत काही दिवस दिखाव्यांपुरती कारवाई केली. त्यानंतर “जैसे थे’. कारवाई दरम्यान विविध पक्ष, संस्था, प्रतिष्ठान, संघटना, बचत गट आदीकडून कापडी पिशव्या मोफत वाटण्यात येत असल्याचे सांगत प्रसिद्दी मिळवल्या. अशा विविध संघटना आणि प्रशासनाकडून यावर ठोस कारवाई केल्याचे दिसून येत नाही. देहुरोड कॉंटोन्मेंट बोर्डाच्या प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी आदेशाला हरताळ फासला आहे. सध्या लोकसभा निवडणुकीमुळे प्रशासकीय यंत्रणेचे कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीच्या कामकाजात कार्यालयीन कर्मचारी व्यस्त आहेत. त्यामुळे प्लॅस्टिक बंदीच्या कारवाईकडे दुर्लक्ष झाले आहे. निवडणुकीच्या कामकाज संपले की, तात्काळ कारवाई केली जाईल.

– पांडुरंग शेलार, कार्यालयीन अधीक्षक, कॅंटोन्मेंट बोर्ड देहुरोड.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.