नगर – मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या नगरमधील साई आनंद एजन्सीला अन्न व औषध प्रशासन विभागाने काम बंद करण्याचे आदेश देवून आज कारणे दाखवा नोटीस बजावली. या एजन्सीसंदर्भात तक्रारी येत असल्याने त्याची दखल आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेवून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नगर कार्यालयास कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार ही कारवाई करण्याच आल्याचे सूत्रांनी सांगितले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नगर कार्यालयामार्फत मेडिकल ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या स्वस्तिक चौकातील साई आनंद एजन्सीची चौकशी करण्यात आली. सहायक आयुक्त (औषधे) अशोक राठोड यांनी काम बंद करण्याचे आदेश देवून कारणे दाखवा नोटीस बजावली.
याशिवाय इतर मेडिकल ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या संस्थेस मेडिकल ऑक्सिजनची विक्री करताना भारत सरकार रसायन व उर्वरक मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार
दर आकारण्याच्या सूचना केल्या आहेत. या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मेडिकल ऑक्सिजन पुरवठा करताना किमतीबाबत तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन राठोड यांनी केले आहे.