पुणे – पुणे शहर रेड झोनमध्ये असताना याचा परिणाम शहरालगतच्या भागांवरही जाणवत आहे. शहरातील बाजारपेठांशी दैनंदिन संपर्क असल्याकारणाने अशा भागांतही करोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण अधिक आहे. याच कारणातून पूर्व हवेलीतील गावांचा समावेश कंटन्मेट झोनमध्ये करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनानेही आदेश दिल्याने अशा गावांवर नियमांचा भार आहे. काही गावांनी स्वयंस्फूर्तीने पाच ते सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळला असल्याने अशा भागांतील बाजारपेठा, दुकाने बंद आहेत. याचा सर्वाधिक परिणाम पुणे-सोलापूर महामार्गावरील गावांत अधिक प्रमाणात जाणवत आहे.
पुणे शहरात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतेच आहे.
यावर प्रभावी उपाय म्हणून महानगरपालिका प्रशासनातर्फे प्रतिबंधित क्षेत्र (कंटन्मेट झोन) तयार करण्यात आले आहेत. यानुसार शहराच्या विविध भागांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये शहरालगतच्या उपनगरांचाही समावेश आहे, तसेच पालिकेत समावेश झाला नसलेल्या; परंतु शहराशी दैनंदिन संपर्क असलेली गावेही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली गेली आहेत, अशा क्षेत्रांकरिता जिल्हा अधिकाऱ्यांकडून निर्देश जारी करण्यात आले आहेत. करोना रुग्ण आढळून आलेल्या गावांपैकी सर्वाधिक गावे पूर्व हवेलीतील आहेत. हडपसर, मांजरी, महादेवनगर, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, तसेच उरुळीकांचन या भागांत करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यातही या गावांतील ग्रामपंचातींनी स्वयंस्फूर्तीने पाच ते सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पाळला आहे.
जिल्हा प्रशासन तसेच पालिका प्रशासनाकडून प्रतिबंधित क्षेत्रांबाहेरील दुकानांसाठी नियमावली तयार करण्यात आली असून त्यानुसार दुकाने उघडी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील परवानगी देण्यात आलेल्या दुकानांमध्ये इस्त्री व लॉंड्री, स्टेशनरी दुकान, वाहन दुरुस्तीची साहित्य विक्री, गृहोपयोगी सामग्री, फूटवेअर, बांधकाम साहित्य विक्री, हार्डवेअर, कपड्याची दुकाने यांचा समावेश आहे, अशी दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू ठेवण्याबाबत मुभा देण्यात आली आहे.
दुकानदारांनी कामगारांना फोटोसह ओळखपत्र देणे, दुकानात काम करताना कामगारांनीही सोशल डिस्टन्स पाळणे, मास्क व हॅण्डग्लोव्हज् वापरणे, दुकानात काम करणाऱ्या कामगारास कोणतीही आजाराची लक्षणे दिसून आल्यास जिल्हा परिषद आरोग्य केंद्र, पलिकेच्या दवाखान्यात तपासणी करून घेणे, हात धुण्यासाठी हॅण्डवॉश, सॅनिटायझरची व्यवस्था करणे, दुकानाचा परिसर, पायऱ्यांवर सोडियम हायपोक्लोराइड द्रावणाची फवारणी करणे, ग्राहकांना सोशल डिस्टन्स पाळण्यास लावणे असे नियम पाळण्यास सांगितले आहे.
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील दुकाने दुपारीच बंद करण्याबाबतचे कुठलेही आदेश नाहीत. पुणे-सोलापूर महामार्गालगतच्या पूर्व हवेलीतील बहुतांशी गावांचा समावेश प्रतिबंधित क्षेत्रामध्ये आहे. तसेच, गावांतही जनता कर्फ्यू असल्याने पोलीस दुकाने उघडू देत नाहीत. त्यामुळे काही गावांत सकाळी 7 ते 10, 8 ते 11 या वेळेतच दूध डेअरी, किराणामाल अशी जीवनावश्यक वस्तूंची दुकानेच सुरू असतात. याबाबत संबंधित ग्रामपंचायतींनी दुकानदारांना परवानगी तसेच वेळ ठरवून दिली आहे.
पोलिसांकडून नियमबाह्य त्रास…
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील काही भागांमध्ये दुपारीच दुकाने बंद करण्याबाबत पोलिसांकडून जबरदस्ती केली जाते. ग्रामपंचायत अथवा पालिकेने दिलेल्या परवानगीनुसारच दुकान उघडे ठेवले असल्याचे सांगितले तरी काही ठिकाणी पोलीस कर्मचारी स्थानिक पोलीस स्टेशन अथवा वरिष्ठांचा आदेश असल्याचे सांगून दुकाने बंद करण्याबाबत व्यावसायिकांना सांगत आहेत. शहरासह लगतच्या गावांतही असे प्रकार घडत आहेत. याबाबत पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पोलीस आयुक्तांशी बोलून या प्रकाराबाबत माहिती दिली, असून प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील दुकाने दुपारी बंद करण्याबाबतचे कुठलेही आदेश दिले गेले नसल्याचे प्रतिबंधित क्षेत्र वगळता कोठेही जबरदस्तीने दुकाने बंद करण्यात येत असल्यास संबंधित व्यावसायिक, दुकानदारांनी थेट पोलीस आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.
करोना बाधितांची संख्या वाढू नये याकरिता गावांत स्वयंस्फुर्तीतून तीन दिवसांचा बंद पाळला जातो. तर, दोन दिवस जीवनावश्यक वस्तूंच्या दुकांनाना ठराविक वेळ दिली जाते. गावात आर्थिक उलाढाल कमी होत असली तरी यातून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यास सोपे जात आहे.
– सुनीता धुमाळ, सरपंच, कुंजीरवाडी
गावातील दुकाने सुरू करण्यात येत आहेत. विशिष्ठ दुकानांसाठी ए ग्रुप आणि बी ग्रुप तयार करण्यात आला असून त्या-त्या ग्रुपमधील दुकाने ठराविक दिवशी सुरू ठेवण्यास दुकानदारांना सांगितले आहे. याकरिता नियम आखून देण्यात आले आहेत.
– राजश्री वनारसे, सरपंच, उरूळीकांचन