जिल्ह्यातील परमीट रुम, बिअरबार राहणार बंद : अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई’
नगर (प्रतिनिधी) – करोना दुसरा बाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. वारवार आवाहन करूनही सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी आता प्रशासनाने कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने तातडीने दुपारनंतर बंद करण्यात आली असून आजपासून परमीट रुम, बिअर बार पूर्णपणे बंद करण्यात आले असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 30 अन्वये बंदी लागू करण्यात आली असून त्याचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, दुपारनंतर नगर शहरातील दुकाने बंद करण्यात आल्याने अघोषित कडकडीत बंद पाळला. त्यामुळे रस्ते देखील ओस पडले होते.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दुपारी पत्रकार परिषदेत दुसरा करोनाचा रुग्ण आढळून आल्याचे जाहिर केल्यानंतर लगेच जिल्ह्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 30 अन्वये विविध बाबींसाठी आजपासून बंदी आदेश लागू केले. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडनीय आणि कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
राज्य शासनाने करोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे.त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन जिल्ह्यात नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणेसाठी हे बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटनांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंडसंहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 43 (1) मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, नगर शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शाळा, महाविद्यालय, चित्रपट गृहे, व्यायामशाळा बंद आहे. त्याबरोबर नागरिक घराबाहेर पडत नसल्याने व्यवसायिकांनी देखील बहुतांशी दुकाने बंद ठेवली आहेत. मात्र आज जिल्ह्यात करोनाचा दुसरा रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर या करोनाच्या विरोधात उपाययोजना सुरू केल्या.
गर्दी टाळण्यासाठी आता शहरातील हे काही दुकाने उघडी होती. ती देखील बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून पोलिसांनी तातडीने रस्त्यांवर फिरून नागरिकांना दुकाने तसेच अन्य कार्यालये बंद करण्याचे आवाहन केले. काही ठिकाणी तर पोलिसांनी स्वत: हून दुकाने बंद करून घेतली. त्यामुळे दुपारनंतर नगर शहरात कडकडीत बंद आढळून आला तर रस्ते पुर्णपणे ओस पडले होते.
काही ठराविक चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. कारण चौकात गर्दी होणार नाही, याची खबरदारी पोलीस घेत होते. गर्दी दिसल्यास ती हटविण्याचे काम पोलीस करीत होते. त्यामुळे रस्त्यांवर कामानिमित्त घराबाहेर पडलेले लोक दिसत होते.
काय राहणार बंद?
जिल्हा कार्यक्षेत्रात सर्व प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा विषयक कार्यक्रम, यात्रा, जत्रा, उत्सव, मिरवणूक, उरुस इत्यादींना मनाई
जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालय, लॉन्स, हॉटेल्स अथवा अन्य वास्तूंमधील मॅरेज हॉल तसेच अन्य विवाहस्थळांच्या ठिकाणांचा वापर करण्यास बंदी
जिल्ह्यात कार्यशाळा, मेळावा, सभा, मोर्चा, आंदोलन, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग यांचे आयोजनास बंदी राहील.
मंदीर, मस्जिद, गुरुव्दारा, चर्च व इतर धार्मिक स्थळे नागरीकांचे प्रवेशासाठी बंद राहतील.
जिल्ह्यातील दुकाने, सेवा, आस्थापना, उपहारगृहे, खाद्यगृहे, खानावळ, शॉपींग कॉम्प्लेक्स मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब, पब, क्रीडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालय, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संग्रहालय, व्हिडीओ पार्लस, ऑनलाईन लॉटरी सेंटर इत्यादी बंद राहतील.
जिल्ह्यातील सर्व परमीट रुम, बिअरबार बंद ठेवण्यात येत आहेत.
सर्व नागरीकांना विहीत कारणाशिवाय अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई राहील.
काय चालु राहणार?
शासकीय, निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम, आस्थापना.
अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रुग्णालय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, दवाखाने,
रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टॅण्ड, बस थांबे व स्थानके, विमानतळ व रिक्षा थांबे,
अंत्यविधी (गर्दी टाळून),
अत्यावश्यक किराणा सामान, दुध, दुग्धोत्पादने, फळे व भाजीपाला, औषधालय,
पेट्रोलपंप, जीवनावश्यक वस्तू, विक्री, वितरीत करण्यास परवानगी राहील. (गर्दी टाळून),
इयत्ता 10 वी इयत्ता 12 वी तसेच राज्य शासन व केंद्र शासनाकडून घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा विद्यापीठ, विश्व विद्यालयाच्या परीक्षा देणारे विद्यार्थी व संबंधीत शैक्षणीक काम पाहणारी व्यक्ती.
प्रसार माध्यमांचे (सर्व प्रकारची दैनिक, नियतकालीके, टिव्ही न्युज चॅनेल इ.) कार्यालय चालू राहतील.
विद्यार्थीसाठी खानावळ तसेच महाविद्यालय, वसतीगृह यामधील कॅन्टींग व मेस (केवळ परीक्षार्थी).