वादात अडकले चिमुकल्यांचे ‘बूट’

केवळ 16 शाळांमध्ये वाटप
महापालिका शाळांची स्थिती

पिंपरी – शिक्षणापासून एकही मूल वंचित राहू नये, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका शहरात तब्बल 105 शाळा चालविते. या शाळांमधील बहुतेक विद्यार्थी गरीब घरातील आहेत. या मुलांना गणवेश, शालेय साहित्य आणि बूट महापालिकेकडून पुरविले जातात.

परंतु सध्या महापालिका प्रशासन आणि ठेकेदारामध्ये सुरू असलेल्या वादात विद्यार्थ्यांचे बूट अडकले आहेत. प्रकरण थेट न्यायालयापर्यंत गेल्याने विद्यार्थ्यांना जुने फाटके बूट घालावे लागत आहेत किंवा अनवाणी पायाने शाळेत यावे लागत आहे. शाळा सुरू होऊन तीन महिने उलटून गेले असताना 105 पैकी केवळ 16 शाळांमध्ये बुटाचे वाटप करण्यात आले आहे.

89 शाळांचे विद्यार्थी वंचित
न्यायालयाने 90 दिवसांत सर्व विद्यार्थ्यांना बूट वाटप करण्याचे आदेश दिलेले असतानाही बुटाचे वाटप अद्याप पूर्ण झाले नाही. परिणामी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमालाही विद्यार्थ्यांनी जीर्ण झालेले बूट घालून किंवा चप्पल घालून हजेरी लावावी लागली, तर काही चिमुकले अनवाणी देखील आले होते. असे होऊनही अद्याप संबंधितांचे डोळे उघडत नाहीत आणि वादात दिवस घालविण्यातच धन्यता मानली जात आहे. एवढेच नव्हे तर सामाजिक संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कधी महापालिकेसमोर कपडे काढून तर कधी ढोल वाजवून आंदोलन केले. परंतु, तरीही विद्यार्थ्यांचा आवाज संबंधितांच्या कानांपर्यंत पोहचला नाही.

सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून नावलौकिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरात 105 शाळा आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेश आणि बूट वाटप केले जाते. मात्र, गेल्या वर्षीपासून विद्यार्थ्यांना मिळणारे बूट आणि गणवेश पदाधिकाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बंद झाले आहे.

बूट वाटपासाठी काढण्यात आलेली निविदा न्यायालयाच्या कचाट्यात अडकल्याने यावर्षी शाळाही शाळा सुरु झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना गणवेश आणि बूट मिळालेले नव्हते. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने निकाल देऊन विद्यार्थ्यांना 90 दिवसांत बूट वाटप करावे, असे आदेश कंत्राटदाराला दिले होते. न्यायालयाने दिलेली ही मुदत संपत आली आहे, तरी केवळ 16 शाळांमधील विद्यार्थ्यांनाच बूट वाटप करण्यात आलेले आहे. त्यामुळे, यावर्षी तरी सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना बूट वाटप होणार की मागील वर्षाचीच पुनरावृत्ती होणार, असा प्रश्‍न पालकांना सतावत आहे.

 

50 शाळेत दप्तराचे वाटप
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तरांचेही वाटप करण्यात आले नाही. आतापर्यंत 50 शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित शाळेमध्ये लवकरच वाटप होईल, असे सांगण्यात येत असले तरी निम्म्यापेक्षा जास्त शाळा बाकी राहिल्या असून त्यांची विद्यार्थी संख्या लक्षात घेता हे कामही लवकर पूर्ण होणार नसल्याचेच दिसत आहे. तसेच गणवेश वाटपाची प्रक्रिया पूर्ण होत आली असून पाच ते सहा शाळेमध्ये गणवेश वाटप बाकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुस्तक, वह्या, रेनकोट वाटप पूर्ण बूट, दप्तर आणि गणवेश वाटप पूर्ण झाले नसले तरी महापालिकेच्या शिक्षण विभागाने वही, पुस्तक, रेनकोट आणि नकाशे वाटप सर्व शाळांमध्ये केले आहे. त्यामुळे, गरजेचे साहित्य तरी वेळेत वाटप केल्याने पालकांकडून समाधान व्यक्‍त होत आहे. तसेच इतर साहित्यही वेळेत देण्याची मागणी होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना बूट वाटपाचे काम सुरु झाले आहे. आतापर्यंत 16 शाळामंधील विद्यार्थ्यांना बूटाचे वाटप करण्यात आले आहे. लवकरच उर्वरित शाळांमधील विद्यार्थ्यांना हे बुटाचे वाटप करण्यात येईल. बूट वगळता दप्तर, गणवेश आणि रेनकोटचे वाटप जवळपास सर्व शाळांमध्ये पूर्ण झाले आहे.

ज्योत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी, महापालिका. 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)