गुरूंनी स्वखर्चातून तेवत ठेवलाय ज्ञानदिवा

मुख्याध्यापक बजरंग जाधव यांचा तीन वर्षांपासून उपक्रम : पटसंख्या वाढली

– गोकुळ टांकसाळे

भवानीनगर – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिकावी, यासाठी लिमटेक येथील मुख्याध्यापक स्वतःच्या गाडीने परिसरातील 46 मुलांना आणण्या-नेण्यासाठी सकाळी 3 आणि शाळा सुटल्यावर 3 ट्रिपा गेली तीन वर्षे हे मुख्याध्यापक विनामूल्य करीत आहेत. बजरंग रामचंद्र जाधव (रा. खांडज ता. बारामती), असे जिल्हा परिषदेचा ज्ञानदिवा तेवत ठेवणाऱ्या मुख्याध्यापकांचे नाव आहे.

लिमटेक येथे आल्यानंतर मुलांची पटसंख्या पाहिल्यावर पटसंख्या रोडावल्याची कारणे त्यांनी शोधली. शाळेपासून 3-4 किलोमीटर अंतरावर इंद्रानगर, पिंपळी, ऋषीटेक परिसरातील मुले, दगडीखाणीवरील आहेत. त्यांना शाळेत येण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा टिकावी यासाठी स्वखर्चाने मुलांसाठी वाहतुकीची सोय करण्याचा निश्‍चय केला. परिसरातील मुलांचे पालक हे बाहेर जिल्ह्यातून मोलमजुरी करण्यासाठी आले आहेत.

जिल्हा परिषद शाळेपैकी बारामती तालुक्‍यातील रुईनंतर लिमटेक येथे दोन मजली इमारत आहे. या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे, प्रोजेक्‍टर, ई-लर्निंग, शुद्ध पाण्याची सोय आहे. मुले संगणक शिक्षण घेत आहेत. या उपक्रमासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते बजरंग जाधव यांचा गौरव करण्यात आला आहे.

मुख्याध्यापक पदावर काम करताना मला जो काही पगार मिळतो, तो चांगला आहे. ज्या कामाचा मी पगार घेत आहे. त्याबद्दल मी कायम कष्ट करण्यास तयार आहे. जीवनात मुलांबाबत कुठेतरी कामाला यावे, त्यांच्या अडचणी सोडाव्यात, अशी आशा होती. ती पूर्ण झाली आहे. मी मुख्याध्यापक म्हणून जोपर्यंत या शाळेत आहे, तोपर्यंत काम करणार आहे. पुढेही ज्या जिल्हा परिषद शाळेत रूजू होईन, तिथे या कामाबाबतआग्रही राहणार आहे.
– बजरंग जाधव, मुख्याध्यापक, लिमटेक.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.