सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तोकडीच

पर्यावरण अहवालातील निरीक्षण : तीन वर्षात पीएमपीकडून जादा बस नाहीत

पिंपरी – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या उद्देशाने 2007 मध्ये पीएमटी आणि पीसीएमटी या महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या वाहतूक शाखांचे विलिनीकरण करून पीएमपी या कंपनीची स्थापना करण्यात आली.

सध्या पीएमपीकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविली जाते. मात्र, 2007 पासून आजतागायत पीएमपीच्या स्थापनेचा उद्देश खरंच सफल झाला का, असा प्रश्‍न यंदाच्या पर्यावरण अहवालामुळे उपस्थित झाला आहे. गेल्या तीन वर्षात पिंपरी-चिंचवड शहराला पुरेशा प्रमाणात बस उपलब्ध झाल्याच नसल्याचे अहवालामुळे समोर आले असून परिणामी खासगी वाहनांचा वापर वाढल्याचे त्यात नमूद आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांची लोकसंख्या पन्नास लाखाच्या पुढे गेली आहे. तसेच, महापालिका हद्दीलगत असलेल्या ग्रामीण भागातही पीएमपीकडून बस सेवा दिली जाते. मात्र अपुरी बस संख्या हा पीएमपी समोरील सर्वात मोठा आणि गंभीर प्रश्‍न आहे. पीएमपीची सेवा सक्षम नसल्यामुळे खासगी वाहनांचा वापर वाढून शहरातील वाहतुकीची परिस्थिती गंभीर झाली आहे. ही बाब यंदाच्या 2018-19 च्या पर्यावरण अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.

पर्यावरण अहवालातील माहितीनुसार 2015-16 मध्ये डिझेलवरील 829 तर सीएनजीवरील 573 बस शहरासाठी देण्यात आल्या होत्या. 2016-17 मध्ये एकाही बसची वाढ झालेली नाही. अहवालानुसार या वर्षातही डिझेलवरील 829 बस तर सीएनजीच्या 373 बस पिंपरी चिंचवडच्या रस्त्यांवर धावत होत्या. 2015 ते 2017 या वर्षांमध्ये भाडेतत्वावरील 653 बस पुरवठा देखील करण्यात आल्याचे नमूद केलेले आहे. तर 2017-18 डिझेलच्या 71 तर सीएनजीच्या 260 बस उपलब्ध दाखविण्यात आल्या आहेत.

या वर्षात ठेकेदाराकडून भाडेत्तत्वावरील बस घेण्यात आलेल्या नाहीत. बसची ही सरासरी खासगी वाहनांची संख्या वाढण्यास कारणीभूत ठरली आहे.
पर्यावरण अहवालात नमूद केल्यानुसार मार्च 2016-17 पर्यंत 1 लाख 405 दुचाकी वाहनांची संख्या होती तर मार्च 2017-18 पर्यंत 1 लाख 9 हजार 979 इतकी वाहनांची नोंद झाली असून दुचाकी वाहनांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम नसल्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा पर्याय निवडावा लागत असल्याचे अहवालातून समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)