नवी दिल्ली – राजस्थानातील दौसा येथे किरण शर्मा या महिलेला फक्त दहा मिनिटांमध्ये दोन वेळा करोनाची लस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुदैवाने त्या महिलेला करोना लसीच्या दोन डोसमुळे कोणताही साईड इफेक्ट जाणवलेला नाही. मात्र या प्रकारामुळे त्या महिलेचे संपूर्ण कुटुंब रात्रभर टेन्शनमुळे झोपू शकले नाही.
43 वर्षीय किरण शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना करोनाची पहिली लस कोरोना लसीकरण केंद्रातील एका खोलीत बसल्याबरोबर देण्यात आली. त्यानंतर जेव्हा त्या आधार कार्ड तपासणाऱ्या महिला कर्मचाऱ्याकडे गेल्या तेव्हा ती कर्मचारी तिथे उपस्थित नव्हती. मात्र नंतर जेव्हा ती महिला कर्मचारी आपल्या जागेवर आली तेव्हा तिने किरण शर्मा यांना त्यांचा मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक विचारला आणि लगेचच करोना लस दुसऱ्यांदा दिली.
घरी परतल्यानंतर किरण शर्मा यांनी लसीचे दोन डोस देण्यात आले असल्याचे सांगितले, तेव्हा कुटुंबातील व्यक्तींना धक्का बसला. यानंतर किरण शर्मा यांचे पती रामचरण यांनी या प्रकाराची तक्रार आरोग्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांकडे केली असता कर्मचाऱ्याने असा काही प्रकार घडला असल्याचे मान्य करण्यास नकार दिला.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संचालक डॉ. नीलम मीणा यांचे म्हणणे आहे की संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि त्यातून जी माहिती समोर आली त्यानुसार किरण शर्मा यांना करोनाची लस देण्यासाठी पिंच केले गेले तेव्हा रक्त बाहेर आले. त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशननंतर त्यांना परत पिंच करण्यात आले आणि करोनाची लस देण्यात आली.